अर्थमंत्रीपदासाठी अहलुवालियांच्या नावावरून काँग्रेसमध्ये मतभेद

May 18, 2009 5:31 PM0 commentsViews: 6

18 मे अर्थमंत्रीपदासाठी माँटेकसिंग अहलुवालिया यांच्या नावावरून काँग्रेसमध्येच मतभेद सुरू आहेत. मनमोहन सिंग यांना आपल्या नव्या मंत्रिमंडळात हवे आहेत, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष आणि अर्थतज्ज्ञ मॉन्टेकसिंग अहलुवालिया. पण मॉन्टेक यांना अर्थमंत्रिपद द्यायला काँग्रेसमधून विरोध होतोय. कारण मॉन्टेक राजकारणी नसल्याचं विरोधकांचं मत आहे. पी. चिदंबरम, प्रणव मुखर्जी किंवा कमलनाथ यांच्याकडं अर्थखातं सोपवावं, असं काही जणांना वाटतंय. शिवराज पाटलांच्या राजीनाम्यानंतर पी. चिदंबरम यांना अर्थखातं सोडून गृहखात्याची जबाबादारी घ्यावी लागली होती. त्यावेळी मॉन्टेकसिंग यांच्याकडं अर्थखातं द्यावं, अशी पंतप्रधानांची इच्छा होती. पण त्यावेळी त्यांना पक्षाकडून परवानगी मिळाली नव्हती. मनमोहन यांच्याप्रमाणेच मॉन्टेक अर्थतज्ज्ञ आहेत. त्यांचा अनुभवही मोठा आहे. म्हणूनच आर्थिक मंदीच्या काळात मॉन्टेक यांच्यासारख्या व्यक्तीकडे अर्थखातं हवं, असा मनमोहन सिंगांचा आग्रह आहे. कारण मनमोहन सिंग यांचा मॉन्टेकसिंग यांच्यावर मोठा विश्वास आहे. मंत्रिमंडळात इतर नावेही चर्चेत आहेत मॉन्टेकसिंग यांना अर्थखातं मिळालं नसल्यास ते खातं कमलनाथ किंवा प्रणव मुखर्जी यांच्याकडे जाऊ शकतं. पी. चिदंबरम यांच्याकडे सध्याचं गृहखातंच कायम राहू शकतं. जितिन प्रसाद आणि सचिन पायलट या तरुण नेत्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. कपिल सिब्बल यांच्याकडे मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा कार्यभार येऊ शकतो. तर आनंद शर्मा माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री होऊ शकतात. सलमान खुर्शीद आणि गुलाम नबी आझाद हे मंत्रिमंडळात मुस्लिमांचं प्रतिनिधित्व करू शकतात. अर्जुन सिंग आणि ए.आर.अंतुले हे दोन चेहरे मात्र नव्या मंत्रिमंडळात दिसणार नाहीत.

close