सहयोगी अपक्ष आमदारांनी केला काँग्रेसमध्ये प्रवेश

September 10, 2014 8:51 PM0 commentsViews: 938

Congress

10 सप्टेंबर :  विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसमध्ये ‘इन कमिंग’ सुरू झाल्याने पक्षासाठी दिलासादायक बाब आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बुधवारी चार अपक्ष आमदारांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. शिरीष चौधरी, सुरेश जेथलिया, वसंतराव चव्हाण आणि जयकुमार गोरे या चार अपक्ष आमदारांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, सुशीलकुमार शिंदे आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

यावेळी बोलत असताना, महाराष्ट्र नंबर एकचे राज्य असून यंदाही राज्यात सत्ता स्थापन करू असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा सादर केला जाईल असे पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी सांगितले.

काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या या आमदारांना विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून तिकीट देण्याचं आश्वासन यावेळी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी दिले. तर धर्मनिरपेक्षतेने सर्वधर्म समभाव राखून विकासाची भूमिका साध्य करण्याचा दृष्टीकोनच काँग्रेसला यंदाही विजय मिळवून देईल असा विश्वास यावेळी सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केला.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close