काश्मिरमध्ये 6 लोक अजूनही अडकलेली

September 11, 2014 2:18 PM0 commentsViews: 742

kasmir rescue

11 सप्टेंबर :   काश्मिरमधल्या महापूरातून लष्कराच्या मदतीने आतापर्यंत एक लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे तर अजूनही तब्बल 6 लाख लोक आपल्या सुटकेची वाट पाहत अडकून आहेत. पुरामध्ये बळी गेलेल्यांची संख्या 200वर गेली आहे. बचावकार्य सुरळीत पार पाडण्यासाठी केंद्रीय अधिकार्‍यांची टीम काश्मीरमध्ये पाठवण्याची सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गृहमंत्रालयाला केली आहे.

दिलासा देणारी बाब म्हणजे काश्मीर खोर्‍यातल्या संपर्क यंत्रणा आता हळुहळु कार्यान्वित होते आहे. पूरग्रस्त भागांमध्ये लष्कराने 18 रिलीफ कॅम्प्स उभारलेले आहेत. अडकलेल्या नागरिक आणि प्रवाशांसोबतच लष्कराने 28 जणांच्या पाकिस्तानी गोल्फ टीमची आणि नेपाळच्या राजदूतांचीही श्रीनगरच्या पुरातून सुटका केली. याशिवाय हवाई दलाची विमान फेर्‍या मारून घराच्या छपरांवर अडकलेल्यांना जीवनावश्यक वस्तूही पुरवण्यात येत आहे. दिल्ली – श्रीनगर हवाई वाहतुकीसाठीच्या तिकिटांच्या दरांवर नियंत्रण ठेवण्याची सूचना डीजीसीएने विमान कंपन्यांना दिल्या आहेत. याशिवाय श्रीनगरमधून बाहेर पडणार्‍या पर्यटकांची गर्दी कमी व्हावी यासाठी दिल्ली – श्रीनगर अशा जास्त फ्लाईट्स चालवण्याची सूचनाही विमान कंपन्यांना करण्यात आली आहे.

दरम्यान, काश्मीरच्या पुरामध्ये अनेक महाराष्ट्रीयन पर्यटकही अडकले आहेत. नालासोपार्‍यात राहणार्‍या मुश्ताक अहमद भट यांची तर कहानी काही औरचं. मुश्ताक अहमद भट यांचं 25 ते 30 जणांचं संपूर्ण कुटुंबच सध्या काश्मीरमध्ये अडकलं आहे. भट यांचं संपूण कुटुंब श्रीनगरच्या पुलवामा जिल्हात राहत होतं. खान यांच्या आई- वडिलांसह 25 ते 30 जणं जम्मू- काश्मीरमध्ये अडकले आहेत. तिथं त्यांचे 2 भाऊ आणि आई- वडील राहतात. त्यांच्या कुटुंबाशी कसलाच संपर्क होत नसल्यानं त्यांना खूपच काळजीत आहेत. तर जम्मू- काश्मीरमधल्या पुरात पालघर जिल्ह्यातल्या चार प्राध्यापक त्यांच्या कुटुंबासह अडकलेत. मोतीलाल कानजी ज्युनिअर कॉलेजचे 4 प्राध्यापक आणि त्यांचे कुटुंबीय असे 16 जण सहलीसाठी काश्मीरला गेले होते. काल सकाळी साडेनऊ वाजता त्यांच्याशी संपर्क झाला होता, त्यावेळी अनंतनाग इथल्या हॉटेलमध्ये आपण सुरक्षित असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. मात्र त्यानंतर त्यांच्याशी कसलाच संपर्क होऊ न शकल्यानं नातलगांना काळजीत आहेत.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close