राष्ट्रवादी 128 जागांवर तडजोड करण्याची शक्यता

September 11, 2014 8:27 PM0 commentsViews: 1739

 prithviraj and sharad pawar

11 सप्टेंबर : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादीचा जागावाटपाचा घोळ मिटण्याची शक्यता आहे. दिल्लीत वरिष्ठ पातळीवर आघाडीची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांच्यात ही चर्चा सुरू झाली आहे.

या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसने नरमाईची भूमिका घेत 144 जागांचा आग्रह सोडला असून 128 जागांपर्यंत तडजोड राष्ट्रवादीकडून केली जाऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. याचाच अर्थ राष्ट्रवादी 128 तर काँग्रेस 160 जागांपर्यंत तडजोड करू शकतात. दरम्यान, निवडणूक होताच 1-2 दिवसांत आघाडीवर शिक्कामोर्तब होईल, असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज पत्रकारांना मुंबईत सांगितलं आहे.

एकीकडे प्रफुल्ल पटेल दिल्लीत काँग्रेसशी चर्चा करताहेत आणि दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार मात्र राष्ट्रवादीने अजूनही 144 जागांचा आग्रह सोडलेला नाही, याचा पुनरुच्चार केला आहे. यावरून काँग्रेसबरोबरच्या आघाडीवरून राष्ट्रवादीमध्येच आता दोन मतप्रवाह असल्याचं दिसून येतं आहे. जागावाटपाची चर्चा सुरू आहे. अजून कशावरही एकवाक्यता नाही. राष्ट्रवादीचा 144 जागांचा आग्रह कायम आहे.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close