आता फाटे फोडू नका !, सेनेच्या कानपिचक्या

September 13, 2014 1:28 PM0 commentsViews: 4283

mahyuti13 सप्टेंबर : आता शिवशाहीच्या निर्धाराला फाटे फोडू नका, शिवसेना-भाजप युती आणि महायुतीत नौटंकी अजिबात चालत नाही अशा
शब्दात शिवसेनेनं आपल्या मित्रपक्षांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या आहे. महायुतीत सर्वच पक्षांनी जास्त जागेची मागणी केलीये त्यातच विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे आज शिवसेनेनं आपलं मुखपत्र ‘सामना’मधून मित्रपक्षांना मोठ्या भावाचा सल्ला दिलाय. तसंच रामदास आठवले, विनायक मेटे, राजू शेट्टी यांच्या कामाचा गौरव करत स्तुतीसुमनंही उधळण्यात आली.

‘सामना’च्या संपादकीयमध्ये काय म्हटलंय ?

“विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकलेच आहे. आता शिवशाहीच्या निर्धाराला फाटे फोडू नका! युत्या व आघाड्यांची एक मजबुरी असते. त्या मजबुरीच्या काळोख्या बोगद्यातून राज्यातील सर्वच पक्ष आज जात आहेत. शिवसेना-भाजप युती आणि महायुतीत नौटंकी अजिबात
चालत नाही. इथे सगळे काही आरपार व आमने सामनेच सुरू असते. महायुतीचे सर्व घटक पक्ष मानाचे मनसबदारच आहेत. राज्यात आधी सत्ता आणावी आणि मग सत्तेचे वाटप काय, कसे करावे त्याचा निर्णय घ्यावा या मताचे आम्ही आहोत. रामदास आठवले हे संयमी व समंजस नेते आहेत. भीमशक्तीचा सन्मान राखण्यासाठीच आठवले यांना त्यांच्या पक्षाचा एकही आमदार नसताना राज्यसभेवर पाठविण्यात आले
व यापुढेही भीमशक्तीचा मानसन्मान नक्कीच राखला जाईल. शिवसंग्राममचे विनायक मेटे यांच्यासारखे समंजस नेतृत्वही महायुतीची ताकदच आहे. आज त्यांना मनाप्रमाणे जागा मिळाल्या नसतील, पण उद्याच्या सत्तेत मेटे यांच्यासारखे नेते मोठी कामगिरी पार पाडू शकतात. जानकरही बारामतीच्या लढाईनंतर राज्याचे मोठे नेते झाले आहेत व त्यांचे मोठेपण दिवसेंदिवस वाढीस लागणार आहे. जानकर यांनीही जागांच्या चक्रव्यूहात न फसता काँग्रेस-राष्ट्रवादीविरुद्धच्या मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावावी अशी जनतेची इच्छा आहे.”

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close