…तर बीड पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचा उमेदवार ?

September 13, 2014 10:16 PM0 commentsViews: 13346

ncp on beed election13 सप्टेंबर : जर का भाजपनं बीड लोकसभा पोटनिवडणुकीत मुंडे परिवाराबाहेरचा उमेदवार दिला तर मग राष्ट्रवादीलाही उमेदवार उभा करायचा की नाही याचा जरूर विचार करावा लागेल, असे संकेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलेला शब्द मोडतील का ? अशी शक्यता निर्माण झालीये.

बीड मतदारसंघातून पोटनिवडणुकीसाठी मुंडे कुटुंबातून उमेदवार दिल्यास राष्ट्रवादी आपला उमेदवार देणार नाही, उमेदवार न देऊन हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केलं होतं. भाजपचे ज्येष्ठ दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर मुंबईत झालेल्या सर्वपक्षीय शोकसभेत पवारांनी उमेदवार देणार नाही असं जाहीर केलं होतं. पण आता पुन्हा राजकारणाच्या सारीपाटावर शरद पवार आपला शब्द मागे मोडतात की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे. पंकजा मुंडे लोकसभेच्या रिंगणात उतरणार की नाही यावरुन तळ्यातमळ्यात सुरू आहे. पण आता बीडचे माजी खासदार जयसिंगराव गायकवाड यांना उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी भाजपमध्ये जोर धरतेय. त्यामुळे कदाचित गोपीनाथ मुंडेंची मुलगी प्रितम मुंडे यांची उमेदवारी मागे पडण्याची शक्यता आहे. त्यामुळेच राष्ट्रवादीने सावध भूमिका घेतली आहे. शरद पवार यांनी शोकसभेत बीडमध्ये लोकसभा पोटनिवडणुकीत उमेदवार देणार नाही असं जाहीर केलं होतं पण जर का भाजपनं बीड लोकसभा पोटनिवडणुकीत मुंडे परिवाराबाहेरचा उमेदवार दिला तर मग राष्ट्रवादी उमेदवार उभा करण्यावर यावर जरूर विचार करेल, असं सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाले होते शरद पवार ?

गोपीनाथ मुंडे आणि घड्याळ असं कधी जमलं नाही. मुंडे आणि आमच्यात कधी पटलं नाही. ते एका टोकाला होते आणि आम्ही दुसर्‍या टोकाला होतो. त्यांनी संघर्ष यात्रा काढून आमचं सरकारही पाडलं पण त्यांच्या सारखा सामाजिक आणि लोकांची जान असणार लोकनेता पुन्हा होणे नाही. त्यांची कारकीर्द वाखण्यांना जोगी होती. त्याकाळी भाजपमध्ये वसंतराव भागवत आणि प्रमोद महाजन या दोघांशी माझे घनिष्ठ संबंध होते. त्यावेळी वसंतराव म्हणाले होते, या (गोपीनाथ मुंडे यांच्यावर) व्यक्तीवर लक्ष ठेवा, उद्याच्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अत्यंत महत्वाची कामगिरी करणारा हा व्यक्ती असून निवडणुकीत हार जीत तर आलीच पण समाजातील सर्व समुदयाच्या माणसांना एकत्रित घेऊन एक सामाजिक ऐक्याला प्रोत्साहन देणारा असा हा नेता होणार आहे असं ते म्हणाले होते. वसंतरावांनी दिलेला शब्द नंतरच्या काळात आम्हाला प्रखरपणे जाणावला. त्यामुळेच बीड मतदारसंघातून पोटनिवडणुकीसाठी मुंडे कुटुंबातून उमेदवार दिल्यास राष्ट्रवादी आपला उमेदवार देणार नाही, उमेदवार न देऊन हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल- शरद पवार

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close