ज्यांचे आमदार जास्त, त्यांचाच मुख्यमंत्री – एकनाथ खडसे

September 14, 2014 4:23 PM0 commentsViews: 987

eknath khadse

14 सप्टेंबर :  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिवसेनेचाच अशी डरकाळी फोडली असतानाच भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी ज्यांच्या जागा जास्त असणार त्यांचाच मुख्यमंत्री बनणार याचा पुनरुच्चार करत शिवसेनेला प्रत्युत्तर दिले आहे. मुख्यमंत्रीपदावरून शिवसेना-भाजप नेते एकमेकांना प्रत्युत्तर देत असतानाच उद्या जागावाटपावर तोडगा काढण्यासाठी उद्धव ठाकरे आणि भाजप नेते राजीव प्रताप रुडी यांच्यात मुंबईत बैठक होणार आहे.

शनिवारी मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी नाकारणार नाही असे सूचक वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केले होते. यानंतर रविवारी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून शिवसेनेने मुख्यमंत्री शिवसेनेचाच असा पुनरुच्चार करण्यात आल्याने शिवसेना-भाजपमध्ये कमालीचा तणाव निर्माण झाला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी शिवसेनेला प्रत्युत्तर दिले आहे. ’25 वर्षांपासून युतीमध्ये ज्यांचे आमदार जास्त त्यांचाच मुख्यमंत्री हे सूत्र राहिले आहे. यंदाच्या निवडणुकीतही हेच सूत्र कायम ठेवण्यात येईल’ असे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे. महायुतीतील घटकपक्षांचे समाधान झाले असून शिवसेना-भाजपमधील जागावाटपावर चर्चा सुरू असल्याचे खडसे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, विधानसभेसाठी मतदान अवघ्या एक महिन्यावर येऊन ठेपले असूनही शिवसेना-भाजप युतीतील जागावाटप अद्याप झालेले नाही. दोन्ही पक्षांचे नेते मुख्यमंत्रीपदावर दावा करत असल्याने तणावात भर पडत आहे. या वादावर तोडगा काढण्यासाठी उद्या भाजप नेते राजीव प्रताप रुडी उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. या बैठकीत तोडगा निघण्याची चिन्हे आहेत. या भेटीपूर्वीच राजीव प्रताप रुडी यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला. यात त्यांनी शिवसेनेसोबतची युती 25 वर्षांपासून असून ही युती अभेद्य आहे. जागावाटपाचा पेचही लवकरच सुटेल असे रुडी यांनी सांगितले. शिवसेना-भाजपमधील जागावाटप झाल्यावर महायुतीतील अन्य मित्रपक्षांसोबत जागावाटप करू, असे रुडी यांनी स्पष्ट केले.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close