ग्राऊंड रिपोर्ट : शिवाजीनगरमधून विनायक निम्हण यांचा लेखाजोखा

September 15, 2014 9:05 AM0 commentsViews: 815

15 सप्टेंबर :  पुण्यातल्या शिवाजीनगर मतदारसंघातील यंदाची विधानसभा निवडणूक ही सध्याचे आमदार विनायक निम्हण यांच्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेची ठरलीय. अखेर आपण काँग्रेसकडूनच लढणार आहोत, असे संकेत खुद्द निम्हण यांनीच IBN लोकमतशी बोलताना दिलेत.

सुशिक्षित शहरी भागातील नागरिक तसंच झोपडपट्ट्या-वस्त्यांमधील जनता असं कॉस्मोपॉलिटन रूप असलेला शिवाजीनगर मतदारसंघ. हा पुण्यातील एकेकाळचा भाजपचा बालेकिल्ला मानला जायचा. मतदारसंघाचं विभाजन होऊन कोथरूड आणि शिवाजीनगर असे 2 मतदारसंघ तयार झाले. नारायण राणेंचे कट्टर समर्थक असलेल्या निम्हण यांनी गेल्या 3 निवडणुकांमध्ये वंदना चव्हाण, अंकुश काकडे यांच्यासह अनिल भोसले, विकास मठकरी यांसारख्या दिग्गजांना धूळ चारली. पण मंत्रिपदापासून वंचित राहिल्याबद्दल खंत त्यांच्या मनात आहे.

दुसरीकडे विनायक निम्हण यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेत तसंच भाजपशी जवळीक साधण्याच्या मुद्द्यावरून काँग्रेसमधले इच्छुक एकवटलेत. निम्हण यांच्यावर गुंडगिरी, दहशत, अकार्यक्षमतेचे आरोप त्यांनी केलेत. विशेष म्हणजे भाजपमधल्या इच्छुकांनीही एकत्र येत निम्हण यांना पराभूत करण्याचा चंग बांधलाय..

विनायक निम्हण यांच्याविरोधात ते ज्या पक्षातून लढतील त्या पक्षाचे बंडखोर तसंच विरोधी पक्षातला उमेदवार तसंच मनसेचाही उमेदवार असणार आहे. निम्हण यांच्यावर जमीन हडपणे, गुंडगिरी, दहशत असे गंभीर आरोप होऊनही त्यांनी विजयाची हॅट्ट्रिक केलीय. या वास्तवाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. यामुळेच यंदा निम्हण पुन्हा बाजी मारणार का, त्यांना पराभवाची चव चाखावी लागणार याकडे समस्त पुणेकरांचं लक्ष लागलं आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close