प्रभाकरनचा मृत्यूनंतरही श्रीलंकेसमोरची आव्हानं कायम

May 20, 2009 7:42 AM0 commentsViews: 3

20 मे, प्रभाकरनचा मृत्यू झाला आणि गेल्या तीन दशकापासूनचा हिंसाचार संपला. श्रीलंकेचे अध्यक्ष महिंदा राजपक्षे यांचा हा ऐतिहासिक विजय आहे. पण आता इथून पुढे त्यांची खरी कसोटी आहे. लिट्टेच्या उदयाला कारणीभूत असलेला श्रीलंकेतला वांशिक प्रश्न सोडवणं, ही त्यांच्यावरची मोठी जबाबदारी आहे.प्रभारकरनच्या मृत्यूबद्दलचं गूढ आता संपलंय. मुल्लाईथिवूमधल्या 'नान्तिकडल लागून' इथे प्रभाकरनचा मृतदेह सापडला. त्याच्या डोक्यावर गोळी लागल्याचं स्पष्ट झालं. त्यावरून श्रीलंका लष्कराच्या चकमकीत तो मारला गेल्याचं उघडकीस आलं. कोलंबोच्या संसदभवनात प्रवेश करणार्‍या राष्ट्राध्यक्ष महिंदा राजपक्षे यांच्यासाठी प्रभारकरनचा अंत हा ऐतिहासिक क्षण आहे. लिट्टेचा पुरता पराभव होऊन आता उत्तर आणि पूर्व भाग जोडले गेले. 25 वर्षांची रक्तरंजित लढाई संपली.राजपक्षे यांनी आता भविष्याकडे पाहयला सुरवात केलीय. त्यांनी आपलं भाषण तामिळ भाषेत सुरू केलं. तामिळ लोकांशी जवळीक साधण्याचा त्यांचा प्रयत्न होता.सिंहली, तामिळी, मल्याळी लोकांनी तीन दशकांपासून शांततेसाठी प्रार्थना केली. आम्ही सर्व या देशाची मुले आहोत. जात किंवा वंशाच्या आधारावर आपल्यात कुठलाच भेद नाही. लिट्टेकडून मारले गेलेले लोक सर्व वंशातले आहेत.श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष महिंदा राजपक्षे यांनी आपल्या भाषणात प्रभाकरनचा उल्लेख केला नाही. उत्तर आणि पूर्व भाग कधी आंतरराष्ट्रीय मानवी हक्क संस्थांसाठी कधी खुले होतील, हे सुद्धा त्यांनी सांगितलं नाही. लिट्टेच्या उदयाला कारणीभूत ठरलेल्या संघर्षाचा राजकीय तोडगा कधी निघेल, हे सुद्धा त्यांनी सांगितलं नाही. उलट राजपक्षे यांनी असा इशारा दिला आहे की श्रीलंकेकडून कुणी अतिरेकी अपेक्षा करू नये. त्याचवेळी त्यांनी श्रीलंकेतल्या या संघर्षाचा देशांतर्गत तोडगा आम्ही शोधू. हा तोडगा सर्व समाजाला मान्य असेल. तामिळ मुद्द्यावरही आम्ही तोडगा काढू. पण तो आंतरराष्ट्रीय दबावाखाली नसेल.पण राजपक्षे यांचं हे वक्तव्य दिल्लीच्या पचनी पडणं शक्य नाही. आता या पुढच्या परिस्थितीचा विचार करण्यासाठी भारत कोलंबोला उच्चस्तरीय शिष्टमंडळ पाठवण्याच्या तयारीत असल्याचं समजतंय.

close