अलिबागच्या किनार्‍यावर पसरला तेलाचा तवंग

September 15, 2014 1:07 PM0 commentsViews: 1476

oil15 सप्टेंबर : अलिबाग तालुक्यातील किहीम आणि आवास समुद्र किनार्‍यावर मोठ्या प्रमाणात तेलाचा तवंग पसरलाय. किनार्‍यावर तेलाचा तवंग वाहून येण्याची गेल्या 4 वर्षांतली ही चौथी घटना आहे. गेल्या 5 दिवसांपासून हा तेलाचा तवंग पसरलाय. 5 ते 6 किलोमीटर परिसरात तेल तवंगाचे गोळे पसरले आहेत. मालवाहू जहाजातून तेल गळतीमुळे तवंग पसरल्याची शक्यता व्यक्त करण्यात येतेय. यामुळे गळती झालेल्या परिसरात माशांचं प्रमाण कमी झाल्याचं मच्छीमारांचं म्हणणंय. या घटनेच्या चौकशीची मागणी केली जात आहे.

अलिबाग तालुक्यातील किहीम आणि आवास समुद्रकिनार्‍यावर मोठ्या प्रमाणात तेलाचा तवंग आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
गेल्या चार वर्षात रायगडच्या समुद्र किनार्‍यालगत तेल तवंग वाहून येण्याची चौथी घटना असल्याने सागरी प्रदुषणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दरम्यान समुद्र किनार्‍यावर तेल तंवग कुठून आला याची चौकशी करण्याची मागणी केली जाते आहे.

आवास आणि किहीम समुद्र किनार्‍यावर गेल्या पाच दिवसांपासून हा तेल तवंग वाहून येत असल्याचे स्थानिक रहिवाशांकडून सांगण्यात
आले आहे. त्यामुळे सध्या समुद्र किनार्‍यावर पाच ते सहा किलोमिटर परीसरात सध्या तेल तवंगाचे गोळे साचले असल्याचे पहायला मिळते आहे. मालवाहू जहाजामधून तेल गळती झाल्याने तेल तवंग समुद्र किनार्‍यावर आला असण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे. तेल तवंगामुळे समुद्र किनार्‍यावर काळ्या रंगाचे चिकट गोळ्यांचा सडा पसरला असल्याचे दिसून येते आहे. त्यामुळे सागरी प्रदुषणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

मुंबई बंदरात वाढलेल्या जलवाहतुकीचे दुष्परीणाम आता कोकण किनारपट्टीवर दिसण्यास सुरूवात झाले आहे. पावसाळ्याच्या सुरूवातीला मालवाहू जहाजे देखभाल दुरूस्तीची काम करत असतात. यानंतर जहाजातील खराब झालेल ऑईल समुद्रात सोडून देतात. हे तेल तवंग गोळ्याच्या रुपाने समुद्र किनार्‍यांवर वाहून येतात. याचे घातक परिणाम समुद्र किनार्‍यांवरील गावांना भोगावे लागतात. खारफुटीसारख्या वनस्पती आणि माशांच्या विविध प्रजातींवर तेल तवंगाचे घातक परीणाम होत असल्याचे निदर्शनास आले आहे. याशिवाय समुद्र किनार्‍यावर य पर्यटनासाठी येणार्‍या पर्यटकांसाठी हे तेल तवंग घातक मानले जात आहे. त्यामुळे आता अशा प्रकारांना रोखण्यासाठी तातडीने पावले उचलणे गरजेच आहे. त्यापुर्वी समुद्र किनार्‍यावर वाहून आलेले तेलाचे गोळे तातडीने उचलणे गरजेच आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close