तेंडुलकरांचं ‘तें दिवस’ प्रकाशित

May 20, 2009 1:31 PM0 commentsViews: 4

20 मे, विजय तेंडुलकरांच्या पहिल्या स्मृतीदिनाचं औचित्य साधून राजहंस प्रकाशनातर्फे तेंडुलकरांच्या अखेरच्या दिवसातलं लिखाण 'तें दिवस' पुस्तक रुपानं एकाच वेळी पुणे, नागपूर आणि औरंगाबाद या तीन शहरांमध्ये प्रकाशित करण्यात आलं आहे.पुण्यामध्ये 'तें दिवस ' या पुस्तकाचं प्रकाशन तेंडुलकरांवर अखेरच्या दिवसात उपचार केलेल्या डॉ. शिरीष प्रयाग यांच्या हस्ते करण्यात आलं. या प्रकाशन सोहळ्यात श्रीराम लागू, अमोल पालेकर, ज्योती सुभाष अनेक दिग्गजांनी आवर्जून हजेरी लावली होती. प्रकाशन झाल्यावर डॉक्टरांनी तेंडुलकरांच्या शेवटच्या आठवणींना उजाळा दिला.कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सोनाली कुलकर्णीने केलं. यावेळी तीन्ही तेंडुलकरांचे अनेक किस्से सांगितले. यावेळी चंद्रकांत काळे यांनी तेंडुलकरांच्या ललित लेखनाचं अभिवाचन करून कार्यक्रमात बहार आणली. आज तेंडुलकर आपल्यात नसले तरी तेंडुलकरांच्या या लेखनानं वाचकांच्या मनात त्यांच्या आठवणी कायमच राहतील अशाच काहीशा भावना रसिक श्रोत्यांमध्ये यावेळी दाटून आल्या. तर नागपूरमध्येही विदर्भ साहित्य संघ आणि राजहंस प्रकाशनतर्फे विजय तेंडुलकर यांच्या 'तें दिवस' या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. नागपूरमधील विनोबा विचार केंद्रात हा प्रकाशन सोहळा पार पडला. 'स्वतंत्र विश्लेषक बुध्दी आणि दृष्टी हे तेंडुलकरांच्या लिखाणाचं वैशिष्ट्य होतं. लिखाणामुळे त्यांना विसावा मिळत होता. आणि तेच त्यांच्या जगण्याचं बळ होतं', असं भाष्य सुप्रसिद्ध नाटककार महेश एलकुंचवार यांनी या प्रकाशन सोहळ्यात केलं. या कार्यक्रमाला ज्येष्ठ विचारवंत डॉ. भा. ल. भोळे उपस्थित होते. औरंगाबादमध्येही मराठवाडा साहित्य परिषदेच्या सभागृहात राजहंस प्रकाशनाने विजय तेंडुलकर यांच्या 'ते दिवस' या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. ज्येष्ठ नाटकार दत्ता भगत, अजित दळवी यांनी यावेळी तेंडुलकरांच्या आठवणी सांगितल्या तसंच मराठवाड्यात तेंडुलकरांनी काही दिवस वास्तव केले त्या आठवणींनाही यावेळी उजाळा देण्यात आला.

close