शिवसेनेचा भाजपसमोर नवा प्रस्ताव

September 17, 2014 1:01 PM0 commentsViews: 2599

BJP And Shivsena
17 सप्टेंबर :   भाजप आणि शिवसेनेदरम्यान जागावाटपाचा तिढा अजून सुटलेला नाही, उलट दोन्ही पक्ष आता जास्तीत जास्त आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत. जागावाटपाच्या मुद्द्यावरून निर्माण झालेल्या तणावातून तोडगा काढण्यासाठी शिवसेनेने पुढाकार घेत भाजपसमोर एक नवा प्रस्ताव मांडला आहे. त्यानुसार शिवसेनेने स्वत:कडे 151 जागा ठेवून मित्र पक्षांसाठी 20 जागा सोडण्याची तयारी दर्शवली आहे. या फॉर्म्युल्याप्रमाणे भाजपच्या वाट्याला आता 117 जागा येतात. त्याला भाजपची तयारी नाही. भाजप 135 जागांच्या मागणीवर ठाम आहे.

याच पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी भाजपाध्यक्ष अमित शहा आज (बुधवारी) मुंबईत येणार आहेत. काल दिल्लीत प्रदेश भाजपच्या कोअर कमिटीच्या नेत्यांशी झालेली चर्चा निष्फळ ठरली होती. त्यामुळे आज मुंबईत पुन्हा बैठक होणार असून जागावाटपावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. मात्र, मुंबईच्या दौर्‍यादरम्यान अमित शहा उद्धव ठाकरेंना भेटायला जाणार नाहीत अशी माहिती IBN लोकमतच्या सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, सर्व शक्यता लक्षात घेऊन शिवसेनेनं आज तालुकाप्रमुख आणि शहरप्रमुखांची बैठक बोलावली आहे. भाजपला जास्त महत्त्व न देता शिवसेनेने युती तोडावी अशी मागणी शिवसैनिक करत आहेत.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close