गतिमंद विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण

September 17, 2014 1:42 PM1 commentViews: 729

amanush marhan

17 सप्टेंबर : गतिमंद मुलांचा सांभाळ करतोय असं भासवत प्रत्यक्षात मात्र गतिमंद मुलांचं शारीरिक शोषण करत असल्याचा धक्कादायक प्रकार अहमदनगर जिल्ह्यात उघडकीस आला आहे. जामखेडमधील इंदिरा सेवाभावी संस्थेच्या मोहटादेवी मतिमंद विद्यालयात घडलेल्या या प्रकाराचा गावकर्‍यांनीच पर्दाफाश केला आहे. हा सगळा प्रकार जामखेडमधील काही युवकांनी समोर आणला आहे.

मोहटादेवी गतिमंद विद्यालयातील 32 विद्यार्थ्यांचा सांभाळ करण्याची जबाबदारी विद्यालयातील शिक्षक आणि कर्मचार्‍यांवर आहे. मात्र याच शिक्षकांकडून या गतिमंद विद्यार्थ्यांना पाईप आणि पट्ट्याने बेदम मारहाण केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. इतकंच नाही तर या मुलांपैकी कोणी आजारी पडल्यास त्याला दवाखान्यात न नेता विद्यालयातील खोलीतच डांबून ठेवलं जातं. याच विद्यालयातील एका मतिमंद मुलीला मारहाण झाल्यामुळे तिच्या डोक्यात जखम झाली होती. मात्र निर्दयी शिक्षक आणि संस्थाचालकांच्या हलगर्जीपणामुळे या मुलीच्या डोक्यात किडे झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

IBN लोकमतला या प्रकरणाची माहिती मिळताच या संस्थाचालकाने सारवासारव करत या मुलीला बीडच्या शासकीय रुग्णालयात दाखल केलं आहे. मारहाणीमुळेच या मुलीच्या डोक्यात इन्फेक्शन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितलं. केवळ शासनाचं अनुदान लुटण्यासाठीच ही शाळा सुरू असल्याचं दिसत आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • PRADEEP H. PAWAR

    very very shameful act, they should punish under appropriate law.

close