‘तुझं माझं जमेना अन्…’ आघाडी-युतीत संशयकल्लोळ

September 17, 2014 3:52 PM0 commentsViews: 2682

yuti and aghadi17 सप्टेंबर : ‘तुझं माझं जमेना अन् तुझ्या वाचून करमेना…’ अशी अवस्था युती आणि आघाडीची झाली आहे. त्यातच भरातभर म्हणजे पोडनिवडणुकीचा निकाल त्यामुळे स्वबळाचा नारा द्यायचा की आहे तसा ‘संसार’ सुरू ठेवायचा अशी परिस्थिती आघाडी आणि युतीवर आली आहे. दोन्हीपक्ष एकमेकांच्या जागावाटपावर नजर ठेवून आहे.

निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या असून आघाडीने प्रचाराचे रणशिंग फुंकले आहे पण जागावाटपाचा प्रश्न सुटलाच नाही तर प्रचार कोणत्या दिशेनं करायचा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे युती आणि आघाडी एकमेकांच्या जागावाटपावर नजर ठेवून आहे. युतीच्या जागावाटपावर आघाडीचं भवितव्य अवलंबून असल्याचं दिसतंय. युतीतल्या घडामोडींवर आघाडीचे नेते लक्ष ठेवून आहेत. काँग्रेसची दिल्लीत चर्चा सुरू आहेत. तर राष्ट्रवादी अजूनही काँग्रेसकडून मिळणार्‍या निरोपाच्या प्रतिक्षेत आहे. दरम्यान काँग्रेसने 288 जागांची तयारी पूर्ण केली आहे. मल्लिकार्जुन खरगेंनी आघाडीसंबंधीचा रिपोर्ट तयार केला आहे. त्यानुसार काँग्रेस पक्ष आघाडीसाठी अनुकुल असल्याचं सांगण्यात आलंय. त्याचवेळी भाजप आणि शिवसेनेची-युती तुटल्यास राष्ट्रवादीची भूमिका निर्णायक ठरणार आहे. काँग्रेसपेक्षा जागा जास्त आल्यास राष्ट्रवादी मुख्यमंत्रीपदावर दावा करणार आहे. दरम्यान, आघाडीत तणाव असल्याचं दिसत असलं तरी आमच्यात सर्व काही आलबेल आहे आणि एक दोन दिवसांत सोनिया गांधी आल्यानंतर अंतिम निर्णय होईल, असं अशोक चव्हाणांनी सांगितलं आहे. तर दुसरीकडे शिवसेनेनंही तालुकाप्रमुखांची तातडीने बैठक बोलावली आहे तर भाजपचे अध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल होणार आहे. त्यामुळे युतीचं काय होणार आणि आघाडी काय ठरवणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close