मुंबईतल्या शिवसेनेच्या अपयशाची उद्धव यांची कबुली

May 20, 2009 2:14 PM0 commentsViews: 1

20 मे, मुंबई मुंबई आणि ठाण्यात शिवसेनेला अपयश मिळाल्याचं शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी कबूल केलं. ते मुंबईत शिवसेना भवनमध्ये बोलत होते. निमित्त होतं 15 व्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून निवडून आलेल्या शिवसेनेच्या 11 खासदारांच्या ओळख करून देण्याचं. शिवसेना भवनमध्ये शिवसेनेतून निवडून आलेल्या पंधराव्या लोकसभा निवडणुकीच्या आमदारांची ओळख करून देण्यात आली. शिवसेना भवनात कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे सर्वच मोठे नेते या कार्यक्रमाला हजर होते. या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेला मिळालेल्या अपयशाची कबुली देताना शिवसेनेची मूळं ग्रामीण भागातही रूजू लागतील असंही ते म्हणाले. मुंबई, ठाण्यातल्या शिवसैनिकांनी पुन्हा एकदा आत्मपरिक्षण करून नव्या जोमाने काम सुरू करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्यात. खासदारांची ओळख सुरू असतानाच आमच्या पक्षात कोणतेही अमर, अकबर, ऍन्थोनी नसताना आपल्याला 11 जागा मिळाल्याचं सांगायलाही उध्दव ठाकरे विसरले नाहीत. यावेळी मनसेचा विषय काढला असता आपली फक्त एक जागा कमी झाली आहे आणि मनसेच्या मतांचा शिवसेनेवर काहीही परिणाम झाला नाही, असं ते म्हणाले. बाळासाहेबांनी राज ठाकरेंशी संबंध तोडलेत. याबद्दल प्रश्न विचारला असता एखाद्या व्यक्तीबद्दल शिवसेनाप्रमुखांनी आपलं मत मांडल्यानंतर शिवसेनेत इतर कुणालाही त्या मुद्द्यावर बोलण्याचा अधिकार नसतो, असं सांगून उध्दव ठाकरे यांनी जास्त काही बोलण्यास नकार दिला.

close