‘हिंदी-चीनी भाई-भाई’, मोदींच्या गावी जिनपिंग यांचे शानदार स्वागत

September 17, 2014 11:25 PM0 commentsViews: 1376

modi and xi jingping news17 सप्टेंबर :‘हिंदी-चीनी भाई-भाई’चा नारा देत आज (बुधवारी) चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनफिंग तीन दिवसांच्या भारत भेटीसाठी दुपारी अहमदाबादमध्ये दाखल झाले. अहमदबाद एअरपोर्टवर जिनफिंग आणि त्यांच्या पत्नीचं जोरदार स्वागत झालं.

त्यानंतर जिनफिंग ग्रँड हयातमध्ये गेले. तिथं राजशिष्टाचार बाजूला सारत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांचं स्वागत केलं. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये दोन महत्त्वाच्या करारांवर सह्या झाल्या.

अहमदाबादमध्ये इंडस्ट्रियल पार्क उभारणं तसंच अहमदाबाद आणि चीनमधल्या ग्वांगझोऊमध्ये सांस्कृतिक देवाघेवाणाचा करार झाला. यानंतरही भारत आणि चीनमध्ये आणखी महत्त्वाचे करार होणार आहेत.

भारतात रेल्वे, उत्पादन आणि ऊर्जा क्षेत्रात चीन भरघोस गुंतवणूक करण्याची शक्यता आहे. दोन्ही देशांमधल्या व्यापारातली तफावत दूर व्हावी अशी भारताची इच्छा आहे. त्यासाठी चीननं भारताला त्याची बाजारपेठ खुली करावी, असं आवाहन नरेंद्र मोदी करण्याची शक्यता आहे.

जिनफिंग साबरमतीच्या काठी

जिनफिंग यांच्या दौर्‍याची सुरुवात रंगारंग झाली. ग्रँड हयातमधल्या चर्चेनंतर जिनफिंग आणि मोदींना साबरमतीचा फेरफटका मारला. शी जिनफिंग आणि नरेंद्र मोदी यांनी साबरमती आश्रमालाही भेट दिली. आणि महात्मा गांधीजींच्या स्मृतींना अभिवादन केलं. साबरमती आश्रमाला भेट दिल्यानंतर साबरमतीच्या काठावर जिनपिंग यांच्यासाठी एक देखणा सोहळा आयोजित करण्यात आला होता. नृत्य आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची इथं रेलचेल होती. तर त्यानंतर चीनच्या राष्ट्राध्यक्षांसमोर गुजरातमधील प्रसिद्ध गरबा नृत्यही सादर करण्यात आलं. दोन्ही नेत्यांनी झोपाळ्यावर बसण्याचाही आनंद लुटला.

 तिबेटी नागरिकांकडून निषेध
दरम्यान, जिनपिंग यांच्या दौर्‍याचा तिबेटी नागरिकांनी निषेध केलाय. चिनी दूतावासासमोर निदर्शनं करणार्‍या 10 आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलंय. तिबेटी नागरिकांच्या प्रतिनिधीने केंद्र सरकारला जिन पिंग यांच्याशी तिबेट प्रश्नावर चर्चा करण्याचीही सूचना केलीय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close