शिवसेनेची भाजपला मित्रपक्षांसह 119 जागांची ऑफर

September 18, 2014 11:14 PM0 commentsViews: 4587

amit shah meet udhav18 सप्टेंबर : शिवसेना आणि भाजपमधला जागावाटपाचा तिढा आता आणखी गुंतागुंतीचा होत चाललाय. शिवसेनेनं भाजपला आता नवी ऑफर दिली आहे. मित्रपक्षांसह 119 जागांची ही नवी ऑफर असल्याची माहिती सूत्रांनी आयबीएन-लोकमतला दिलीय. त्यामुळे भाजपला अतिशय कमी जागा मिळणार असं दिसतंय. पण भाजपला हा पर्याय मान्य होण्याची शक्यता नाही. त्यामुळे महायुतीतला तिढा आणखी चिघळणार हे स्पष्ट आहे.

जागावाटपावर तोडगा काढण्यासाठी शिवसेनेच्या नेत्यांची आज मुंबईत ‘मातोश्री’वर महत्त्वाची बैठक झाली. आपला स्वाभिमान न गमावता युतीबद्दल निर्णय घ्यावा, असं शिवसेना नेत्यांचं म्हणणं आहे. महायुती ठेवायची की तोडायची याचे सर्वधिकार शिवसेनेच्या नेत्यांनी आणि शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवले आहेत. यावेळी शिवसेनेनं भाजपला मित्रपक्षांसह 119 जागांची ऑफर दिलीये. तर दुसरीकडे भाजपनेही युतीचा उल्लेख करण्याचं टाळलंय. अहमदनगरमध्ये पंकजा मुंडे यांच्या संघर्ष यात्रेच्या समारोप कार्यक्रमात भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी ‘भाजपयुक्त महाराष्ट्र करूया’ असा नवा नारा देऊन युती नकोच असे संकेत दिले आहे. शहा यांनी या अगोदर कोल्हापूरमध्ये झालेल्या सभेत आम्ही दोन पावलं पुढे घेतो तुम्ही दोन पावलं पुढे या असं आवाहन केलं होतं. मात्र त्यानंतर नगरमध्ये त्यांनी वेगळाच सूर लगावला. तर दुसरीकडे महायुतीच्या घटकपक्षांची धावापळ मात्र सुरू आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी उद्धव ठाकरेंची दोनदा भेट घेतली. जर जागा कमी पडत असतील तर आमच्या काही जागा घ्या अशी विनंतीच शेट्टींनी केली. तर रामदास आठवले यांनी युती टिकली पाहिजे पण आम्हाला 10 जागा तरी मिळाव्यात अशी मागणी केलीये. आता शिवसेनेनं दिलेली नवी ऑफर जवळपास मान्य नसल्यास सारखीच असून भाजप काय निर्णय घेते याकडे सगळ्यांचं लक्ष्य लागलंय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close