भारतीय मुस्लीम अल कायदाला थारा देणार नाहीत – नरेंद्र मोदी

September 19, 2014 9:14 AM0 commentsViews: 2702

Modi Exclusive

19 सप्टेंबर :  भारतीय मुस्लीम अल कायदाला थारा देणार नाहीत असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलाय. भारतीय मुस्लीम भारतासाठी जगतील आणि भारतासाठी मरतील असा विश्वास त्यांनी CNN ला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केला. पंतप्रधान झाल्यानंतर मोदींची पहिलीच आंतरराष्ट्रीय मुलाखत आहे. अल कायदा भारतीय मुस्लिमांवर अन्याय करत असल्याची टीका त्यांनी केली. तसंच अल कायदा हे मानवतेविरोधातलं संकट आहे, एखादा देश किंवा समूहाविरोधातलं नाही असं ते म्हणाले.

‘अल कायदाचा म्होरक्या आयमान अल जवाहिरीनं एक व्हिडिओ प्रसिद्ध केलाय आणि भारतात अल कायदाचा तळ उभारण्याचं आवाहन केलंय. गुजरात आणि काश्मीरमधल्या मुस्लिमांना अत्याचारातून मुक्त करायचंय असं तो म्हणतो. अल कायदाला यात यश येईल, असं तुम्हाला वाटतंय का?’ असं विचारलं असताना, ते म्हणाले ‘मला असं वाटतं की अल कायदा भारतीय मुस्लिमांवर अन्याय करत आहेत. जर कोणाला असं वाटत असेल की भारतीय मुस्लीम त्यांच्या तालावर नाचतील, तर तो त्यांचा गैरसमज आहे. भारतीय मुस्लीम भारतासाठी जगतील, ते भारतासाठी मरतील. त्यांना भारताचं वाईट व्हावं असं वाटणार नाही’, असं मोदी म्हणाले.

तर ‘तुमच्या देशात 17 कोटी मुस्लीम आहेत आणि त्यांच्यात अल कायदाचे सदस्य जवळपास नाहीत, हे कशामुळे शक्य झालं असं तुम्हाला वाटतं? त्यांच्यावर हा प्रभाव कशामुळे पडला नाही?’ असं विचारलं असताना ‘सर्वप्रथम मी काही याचं मानसिक किंवा धार्मिक विश्लेषण करू शकत नाही. पण प्रश्न हा आहे की, जगात मानवतेचं संरक्षण झालं पाहिजे की नाही? मानवतेवर विश्वास ठेवणार्‍यांनी एकत्र यावं की नाही? हे मानवतेविरोधातलं संकट आहे, फक्त एखादा देश किंवा समूहाविरोधातलं संकट नाही. त्यामुळे याकडे माणुसकी आणि अमानुषता यांच्यातला संघर्ष’ असल्याचं त्यांनी यावेळेस सांगितलं.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close