प्रणव यांना अर्थमंत्रीपद मिळण्याची शक्यता : नव्या मंत्रिमंडळाविषयी उत्सुकता

May 21, 2009 8:33 AM0 commentsViews: 4

21 मे, डॉ. मनमोहन सिंग यांनी राष्ट्रपतींना भेटून सत्ता स्थापन करण्याचा दावा केला. यानंतर लगेचच दिल्लीत चर्चा सुरू झाली ती, त्यांच्या मंत्रिमंडळात कुणाकुणाला स्थान मिळेल याची. आयबीएन लोकमतला मिळालेल्या माहितीनुसार प्रणव हे देशाचे नवे अर्थमंत्री होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. मनमोहन सिंग यांचं नवं मंत्रिमंडळ कसं असेल याविषयी सगळ्यांनाच उत्सुकता आहे. पी. चिंदंबरम यांच्याकडे पुन्हा एकदा गृहमंत्रालयाची जबाबदारी दिली जाऊ शकते. तसंच ए. के. अँटोनी यांच्याकडेही पुन्हा संरक्षण खातं दिलं जाईल, असं सूत्रांचं म्हणणं आहे. पण चौथं सगळ्यांत महत्त्वाचं खातं म्हणजे परराष्ट्र मंत्रालय कुणाकडे जाईल याविषयी कमालीची चर्चा आहे. उत्तर प्रदेशातले वरिष्ठ नेते सलमान खुर्शीद किंवा कमलनाथ यांच्यापैकी एकाची वर्णी इथे लागू शकते, असं समजतंय.दिल्लीतले वरिष्ठ नेते कपिल सिब्बल यांना मानव संसाधन मंत्रीपद दिलं जाण्याची शक्यता आहे. तसंच माहिती आणि प्रसारण खातं आनंद शर्मांकडेच राहील असं सांगण्यात येत आहे. तरुण खासदारांमध्ये जतीन प्रसाद, सचिन पायलट, आणि संदीप दीक्षित यांचा समावेश जवळपास निश्चित मानला जातोय. तर मित्रपक्षांपैकी द्रमुक आणि तृणमूल काँग्रेसला प्रत्येकी दोन ते तीन कॅबिनेट आणि तीन – तीन राज्यमंत्रीपदं मिळतील असं सूत्रांनी सांगितलंय. नऊ खासदार असलेल्या राष्ट्रवादीला एक कॅबिनेट आणि एका राज्यमंत्रीपदावरच समाधान मानावं लागेल असं दिसतंय. प्रफुल्ल पटेल यांना पुन्हा नागरी उड्डयन मंत्रालय मिळण्याची शक्यता कमी आहे. महाराष्ट्राबद्दल बोलायचं झालं तर विलास मुत्तेमवार यांच्याऐवजी रामटेकहून निवडून आलेल्या मुकुल वासनिक यांना मंत्रीमंडळात स्थान मिळू शकतं. राज्यसभेवर निवडून येऊन कॅबिनेटमध्ये जागा मिळवायची यासाठी विलासरावांनीही जोरदार फिल्डिंग लावली आहे. तसंच मुंबईतल्या गुरुदास कामत किंवा प्रिया दत्त यांच्यापैकी एकाला राज्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

close