ग्राऊंड रिपोर्ट : कुडाळमध्ये नारायण राणेंची प्रतिष्ठापणाला

September 19, 2014 8:59 PM0 commentsViews: 2629

स्नेहल पाटकर, कुडाळ, सिंधुदुर्ग

19 सप्टेंबर : सिंधुदुर्गातल्या कुडाळमध्ये काँटे की टक्कर पहायला मिळतेय. उद्योगमंत्री नारायण राणे यांची प्रतिष्ठापणाला लागणार आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत निलेश राणे यांचा पराभव झाला होता. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत कुडाळमध्ये वेगळी समीकरणं पहायला मिळणार आहेत.

2009 ला झालेल्या मतदारसंघ पुनर्रचनेत नारायण राणेंचा मुळचा कणकवली मतदारसंघ फुटून अर्धा भाग कुडाळ तर काही भाग कणकवली मतदारसंघात समाविष्ट झाला आणि स्वत:चा बालेकिल्ला मालवणवर मदार ठेवत राणेंनी निवडणूक लढण्यासाठी कुडाळवर शिक्का मारला, जो आत्ताचा कुडाळ-मालवण मतदार संघ..यंदा मात्र लोकसभेत निलेश राणेंच्या पानिपतामुळे गणितं वेगळी असल्याची चर्चा कुडाळात रंगतेय. मराठा आरक्षणाचं गाजर ज्यांना खाऊ घातलंय ते मराठा मतदार राणेंना कितपत साथ देतायत हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

निसर्गसुंदर कुडाळची माती गेल्या काही वर्षांत निवडणुकीच्या राजकारणाने धुमसतेय. मुंबईत राजकीय कारकीर्द सुरू करणार्‍या राणेंनी राजकारणासाठी कुडाळचा मतदारसंघ निवडला आणि राज्याचं लक्ष कुडाळकडे लागलं.

राणेंच कुडाळवर निर्विवाद वर्चस्व असल्याचं चित्र जरी उभं केलं जात असलं तरी सध्या राणेंसमोर शिवसेनेच्या वैभव नाईकांनी कडवं आव्हान उभं केलंय. वैभव नाईक हे श्रीधर नाईक यांचे पुतण आहेत.

गेल्या निवडणुकीत राणेंचा अवघ्या 26 हजारांनी विजय झाला होता. सध्याच्या कणकवली मतदारसंघात भाजपच्या कमळाला पावणारा देवगडचा भाग येत असल्यामुळे राणेंनी आपला बालेकिल्ला असलेल्या कुडाळ-मालवणमधून लढण्याचा सेफ गेम खेळला. यंदा मात्र लोकसभेत निलेश राणेंचं पानिपत झाल्यामुळे इथली राजकीय गणितं बदलली आहेत. कुडाळमध्ये 45 टक्के मराठा मतदार आहेत. मराठा आरक्षणाचं गाजर ज्यांना खाऊ घातलंय ते मराठा मतदार राणेंना कितपत साथ देतायत हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

राजीनाम्याचे इशारे, आरोपांच्या फैरी आणि त्यानंतर घेतलेली सपशेल माघार यामुळे ही निवडणूक राणेंच्या दृष्टीने अस्तित्वाची लढाई
बनलीय. काँग्रेसच्या प्रचार समितीच्या प्रमुखांना स्वत:च्याच मतदारसंघात जिंकण्यासाठी शर्थ करावी लागणार आहे.

कुडाळ मालवण मतदारसंघात जातीनिहाय मतदारसंख्या कशी आहे ?

मराठा समाज – 40-45 %
भंडारी समाज – 15 ते 20 %
वैश्यवाणी समाज – 10-15 %
ब्राह्मण आणि गाभित समाज – 5-10 %

2009 साली मिळालेली मतं
नारायण राणे – 72 हजार मतं
वैभव नाईक – 48 हजार 666 मतं

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close