खेचाखेची सुरूच, भाजपने सेनेचा प्रस्ताव धुडकावला

September 20, 2014 11:39 PM2 commentsViews: 7169

sena on bjp seats

20 सप्टेंबर : आमचा प्रस्ताव..तुमचा प्रस्ताव…दिवसभर महायुतीत सुरू असलेल्या प्रस्तावनाट्यावर मध्यरात्रीपर्यंत तोडगा निघू शकला नाही. शिवसेनेनं दिलेला 155-117 जागांचा प्रस्ताव भाजपने फेटाळून लावला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी ‘मातोश्री’वर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि हा प्रस्ताव मान्य नसल्याचं स्पष्ट केलं.

‘ही दोस्ती तुटायची नाय’ असा सुरात सूर मिसळून युतीचे नेते जागावाटपासाठी बैठकीला बसले पण मुख्यमंत्रीपदाची शर्यत जास्त जागावर आधारीत असल्यामुळे भाजप आणि शिवसेनेमध्ये जागावाटपावरुन खेचाखेची सुरू आहे. शिवसेना 155 तर भाजप 117 जागा लढतील असा फॉर्म्युला शिवसेनेनं भाजपपुढे ठेवला. यामुळे गेल्यावेळेच्या तुलनेत शिवसेनेला 14 तर भाजपला 2 जागांवर पाणी सोडावं लागणार होतं. दोन्ही पक्षांनी सोडलेल्या या जागा घटकपक्षांना देण्यात येणार असंही ठरलं होतं. मात्र रात्री 10.30 च्या सुमारास भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी ‘मातोश्री’वर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. साधारण: अर्धातास ही बैठक सुरू होती. ‘मातोश्री’वरून बाहेर पडल्यानंतर शिवसेनेचा हा प्रस्ताव अमान्य असल्याचं फडणवीस यांनी माध्यमांना सांगितलं. आमच्या जागेत घटकपक्षांना सहभागी केल्यामुळे मागील निवडणुकीतील जागेपेक्षा आमच्या जागा आणखी कमी होत आहे. त्यामुळे शिवसेनेचा प्रस्ताव आम्हाला अमान्य आहे. आता उद्धव ठाकरे यावर योग्य तो निर्णय घेतील असं सांगून पुन्हा जागावाटपाचा चेंडू सेनेच्या कोर्टात टोलावला.

आज दिवसभरात…

शनिवारी सकाळी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. याबैठकीला भाजपचे निवडणूक प्रभारी ओमप्रकाश माथूर उपस्थित होते.
भाजपने 135-135 जागांचा प्रस्ताव पाठवला तर सेनेनं तो फेटाळून लावला आणि 150 + प्रस्ताव सेनेनं भाजपला दिला होता. पण शिवसेनेकडून असा कोणताही नवा प्रस्ताव आला नसल्याचं ओमप्रकाश माथूर यांनी स्पष्ट केलं. त्यानंतर पुन्हा दुपारी भाजपच्या खासदार पूनम महाजन यांच्या निवासस्थानी भाजप कोअर कमिटीची बैठक पार पडली. पण यात कोणताही तोडगा निघाला नाही. रविवारी दिल्लीतल्या नेत्यांना यादी सोपवणार असल्याचं भाजपकडून सांगण्यात आलंय. जागावाटपासंदर्भातील माहितीही संसदीय मंडळ समितीला देण्यात येईल, असंही भाजपनं स्पष्ट केलंय. त्यानंतर दिवसभर भाजप आणि शिवसेनेचे नेते एकमेकांची भेट घेऊन जागावाटपावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करत होते. तर महायुतीचे घटक पक्ष युतीच्या नेत्यांची मनधरणी करत होते.

शिवसेनेचं मिशन 150 +

शिवसेनेच्या मिशन 150 + मुळे हे घोडं अडलंय. अशातच आदित्य ठाकरेंची भूमिका महत्त्वाची ठरतीये. महाराष्ट्रासाठी चांगलं तेच होईल. पण आम्ही 150 वर ठाम आहोत, असं म्हणत त्यांनी पुन्हा एकदा आपल्या मिशन 150 चा पुनरूच्चार केला. पहिल्यांदाच आदित्य ठाकरे सक्रीय राजकारणात अशा प्रकारे मोठी भूमिका बजावताना दिसत आहेत. भाजपनं किंवा मित्र पक्षांनी दिलेल्या प्रस्तावावरून तोडगा काढण्याऐवजी शिवसेना आपल्या मिशन 150 वर अडून बसलेली दिसतेय. शिवसेनेच्या मिशन 150 च्या आग्रहामुळे महायुतीचं जागावाटपाचं घोडं अडलंय, असं बोललं जातंय.

उद्धव ठाकरे उद्या निर्णय घेणार – संजय राऊत

युतीत जागावाटपाचा तिढा आता आणखी चिघळत चाललाय. शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम असून यावर उद्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे निर्णय जाहीर करणार असल्याचं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. शिवसेनेनं 150 + जागेची मागणी केलीये. मात्र भाजपने यास नकार दिला आहे त्यामुळे उद्या उद्धव उद्या काय निर्णय जाहीर करता हे महत्वाचे ठरणार आहे.

शिवसेनेचा नवा प्रस्ताव

शिवसेना :155 जागा (-14)
भाजप : 117 जागा (-2)
मित्रपक्ष : 16 जागा

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • VINOD

    FULL TRP – YUTI SHIVAY PARAY NAHI UGACHAH MERATHON MEETINGS GHET AAHET – KONAKADECH DRING NAHI AAHE SWATANTRA LADHNYACHI……LAKSHA DEU NAKA MITRANO YUTI HONAAR……….FULL TIMEPASS

  • bhaskar

    vadila natar thampane uabhe rahane garajeche aahe

close