आता बस्स !, राष्ट्रवादीकडून काँग्रेसला एका दिवसाचा ‘टाइम’

September 20, 2014 11:30 PM0 commentsViews: 1644

praful patel20 सप्टेंबर : एकीकडे युतीत जागावाटपावरून खेचाखेची सुरू आहे तर आघाडीतही तिच परिस्थिती आहे. जागावाटपावरुन आता राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेतलीये. काँग्रेसचा 124 जागांचा प्रस्ताव राष्ट्रवादीने धुडकावून लावलाय. जागावाटपाची चर्चा पूर्ण करण्यासाठी राष्ट्रवादीनं काँग्रेसला उद्यापर्यंतचा नवा अल्टिमेटम दिलाय. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी दिल्ली पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीची भूमिका मांडली.

गेल्या महिन्याभरापासून काँग्रेस आणि राष्ट्रवादीत जागावाटपावरुन रस्सीखेच सुरू आहे. अखेरीस निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आणि आजपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रियाही सुरू झालीये. पण आघाडीत जागावाटपाचा तिढा कायम आहे. दोन वेळेस राष्ट्रवादीने काँग्रेसला इशारा देऊन ही काँग्रेसने प्रतिउत्तर दिलं नाही.

अखेरीस आज दिल्लीत राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसला पुन्हा इशारा दिलाय. राष्ट्रवादीची भूमिका नेहमी संयमाची राहिली आहे, त्यामुळे आघाडी व्हावी अशी आमची भूमिका आहे पण बदलत्या परिस्थितीत राष्ट्रवादीला जास्त जागा मिळाल्या हव्यात. आमची मागणी निम्म्या जागांची होती. त्यामुळे काँग्रेसच्या 124 जागांचा फॉर्म्युला अमान्य असल्याचं प्रफुल्ल पटेल यांनी ठणकावून सांगितलं.

आमची 144 जागांची मागणी कायम असल्याचंही पटेल यांनी सांगितलं. लोकसभेतली कामगिरी पाहता राष्ट्रवादीची जास्त जागांची मागणी योग्य आहे, असंही प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. उद्यापर्यंत काँग्रेसचा सकारात्मक प्रस्ताव आला नाही, सोमवारी मुख्यमंत्र्यांकडे जाऊन तोडगा काढण्याची विनंती करणार असल्याचं ते म्हणाले. आघाडी टिकवण्याची राष्ट्रवादीची इच्छा आहे, पण जास्त जागा हव्यात असं त्यांनी स्पष्ट केलं.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close