मंगळयान ‘वेशीवर’ पोहचले, आता लवकरच मंगळ प्रवेश !

September 22, 2014 5:56 PM0 commentsViews: 1052

mars orbiter mission22 सप्टेंबर : भारतासाठी अत्यंत महत्वाचा आणि अभिमानाचा क्षण आता दृष्टीक्षेपात आलाय. महत्त्वाकांक्षी मंगळयानाच्या काउंटडाऊनमधील शेवटच्या टप्प्यातली महत्त्वाची परीक्षा पार पडली आहे. मंगळयानाच्या इंजिनचं टेस्ट फायरिंग यशस्वी झालेलं आहे. 440 न्यूटन लिक्विड एपोजी मोटार (एलएएम) हे इंजिन 4 सेकंदासाठी सुरू करण्यात आलंय. या इंजिनची यशस्वी चाचणी झालीये.त्यामुळे आता मंगळयान मंगळापासून काही अंतर दूर आहे.

300 दिवस आणि 75 कोटी किलोमीटरचा प्रवास करून भारताचं महत्वाकांक्षी मंगळयान आता मंगळ ग्रहाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलं आहे. येत्या दोन दिवसात अर्थात 24 सप्टेंबर 2014 ला मंगळयान मंगळाच्या कक्षेत प्रवेश करणार आहे. मंगळयानाच्या या प्रवासातला महत्वाचा टप्पा आज यशस्वीपणे पार पडला. मंगळयानचं 440 न्यूटन लिक्विड एपोजी मोटार (एलएएम) या इंजिनाची चाचणी घेण्यात आली. हे इंजिन तब्बल 300 दिवस बंद होतं. आज हे इंजिन सुरू करण्यात आलं. हे इंजिन 4 सेकंद सुरू करण्यात आलंय. इंजिन व्यवस्थितीरित्या सुरू असल्याचं स्पष्ट झालंय. हे इंजिन सुरू असल्यामुळे आता लवकरच मंगळयान दोन दिवसांत मंगळाच्या गुरुत्वीय प्रभाव क्षेत्रात प्रवेश करणार आहे.

ही मंगळ मोहीम यशस्वी झाली तर मंगळावर पहिल्याच प्रयत्नात पोहोचणार्‍या देशांमध्ये भारत पहिला आशियाई देश ठरेल. दुसरीकडे नासाचं ‘मेवेन’ हे मंगळयान मंगळाच्या कक्षेत यशस्वीपणे पोहोचलं आहे. मंगळावरच्या वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी ‘मेवेन’ पाठवण्यात आलंय. यापूर्वी अमेरिका, रशिया आणि युरोपियन युनियन यांच्या मंगळ मोहिमा यशस्वी झाल्या आहे. तर चीन आणि जपान यांच्या मोहिमा अपयशी ठरल्या आहेत. त्यामुळे मार्स ऑर्बिटर यानाला मंगळाच्या कक्षेत सुखरूप दाखल करणं, हे भारतीय शास्त्रज्ञांपुढचं आव्हान असणार आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close