राष्ट्रवादी नरमली, उद्या आघाडीची बैठक ठरली !

September 22, 2014 6:36 PM0 commentsViews: 1523

praful patel_on_congress22 सप्टेंबर : आघाडीत जागावाटपावरून झालेली बिघाडी आता अंतिम टप्प्यात पोहचली आहे. राष्ट्रवादीने अगोदर आक्रमक भूमिका घेत काँग्रेसला इशारा दिला होता. आता उद्या (मंगळवारी) काँग्रेस आणि राष्ट्रवादी समोरासमोर चर्चा करण्यासाठी एकत्र येणार आहेत. मुख्यमंत्र्यांचा फोन आला होता त्यानंतर उद्या 10 वाजता बैठकीचं आयोजन करण्यात आलंय अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी दिली तसंच काँग्रेसचा 124 जागांचा प्रस्ताव अमान्य असून आमची भूमिका ठाम आहे असंही पटेल यांनी स्पष्ट केलं.

गेल्या महिन्याभरापासून आघाडीत जागावाटपावरून रस्सीखेच सुरू आहे. निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आणि आता उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रियाही सुरू झाली तरी आघाडीत जागावाटपाचा तिढा काही सुटलेला नाही. दोनच दिवसांपूर्वी राष्ट्रवादीने 144 जागांवर ठाम राहत काँग्रेसला एका दिवसांची मुदत दिली. पण काँग्रेसनेही ‘थंड करके खावो’ हा आपला जुना पवित्रा घेत राष्ट्रवादीला अडकवून ठेवले.

अखेरीस आज राष्ट्रवादीने आज आपला संयम सोडत उद्या चर्चेसाठी तयारी दर्शवली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी आपल्याला फोन केला होता आणि जागावाटपावर चर्चा केली होती. आज सकाळीही त्यांच्याशी फोनवर चर्चा झाली त्यानुसार आम्ही उद्या सकाळी 10 वाजता समोरासमोर चर्चा होणार आहे अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकारांना दिली. आघाडी कायम राहावी अशी राष्ट्रवादीची भावना आहे.

पण काँग्रेसने दिलेला 124 जागांचा प्रस्ताव आम्हाला अमान्य आहे. आमची भूमिका ठाम असून जागावाटपाच्या घोळातून मार्ग निघावा अशी अपेक्षा पटेल यांनी व्यक्त केली. तसंच आम्ही काँग्रेसला अल्टिमेटम दिला नाही अशी सारवासारवही पटेल यांनी केली. दरम्यान, आज दिल्लीत पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासोबत मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्या माणिकराव ठाकरे यांची बैठक पार पडली. याबैठकीत 288 जागांवर चर्चा झाली त्यामुळे उद्या आघाडीच्या नेत्यांची बैठक होणार असून जागावाटपाचा तिढा सुटतो की आघाडी तुटते हे पाहण्याचं ठरेल.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close