ग्राऊंड रिपोर्ट : होमग्राऊंडवर सतेज पाटलांसमोर महायुतीचं आव्हान !

September 23, 2014 8:53 PM0 commentsViews: 2015

संदीप राजगोळकर, कोल्हापूर

23 सप्टेंबर : दोन्ही काँग्रेसचा अभेद्य किल्ला अशी कोल्हापूरची ओळख आहे. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत युतीने कोल्हापूरमध्ये दोन्ही काँग्रेसना धोबीपछाड दिला होता. यंदाही कोल्हापूरचे मंत्री सतेज पाटील यांच्यासमोर महायुतीचं आव्हान आहे.

मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय अशी सतेज पाटील यांची ओळख…फार कमी वेळेत त्यांनी राजकारणावरची आपली पकड मजबूत केलीये.
त्याशिवाय डॉ.डी.वाय पाटील यांच्या रुपाने त्यांना चांगला राजकीय वारसाही मिळाला. 2004 मध्ये दक्षिण कोल्हापूर मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवताना सतेज पाटलांनी दिग्विजय खानविलकर यांचा पराभव केला. त्यानंतर त्यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला आणि 2009 साली ते मताधिक्याने पुन्हा दक्षिणमधून निवडून आलेत. मंत्रीपदाचा वापर करून विकासकामं केल्याचा त्यांचा दावा आहे.

युतीमध्ये कोल्हापूर दक्षिणची जागा भाजपच्या वाट्याची आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष महेश जाधव हे इथून निवडणूक लढवायला इच्छूक आहेत. मंत्र्यांच्या मतदारसंघातच अवैध धंद्यांना ऊत आल्याचा आरोप जाधव यांनी केलाय.

टोल विरोधी कृती समितीचे निमंत्रक निवास साळोखे हेही अपक्ष म्हणून सतेज पाटलांसमोर आव्हान उभं करणार आहे. विशेष म्हणजे या उमेदवारीचा आणि टोलविरोधी कृती समितीचा काहीच संबंध नसल्याचा दााव साळोखे यांनी केलाय.

दुसरीकडे कोल्हापूरचे अनेक उद्योजक राज्य सरकारच्या निर्णयांवर नाराज आहेत. कोल्हापूरचे मंत्रीही उद्योजकांसाठी काहीच करत नाहीत असा आरोप करत उद्योजकांनी कर्नाटकात जायचा निर्णय घेतलाय. त्यामुळे आता उद्योजक संघटनाही सतेज पाटलांच्या विरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. सतेज पाटील यांच्यासमोर अजून बलाढ्य उमेदवार उभा ठाकला नसला तरी त्यांना महायुतीचं मोठं आव्हानं असणार आहे हे नक्की…

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close