राज ठाकरे यांचं शिवसेनेवर टीकास्र

May 22, 2009 4:08 PM0 commentsViews: 156

22 मे, 'बाळासाहेबांना माझ्याबद्दल बोलायचा अधिकार आहे. त्यांना मी उत्तर देणार नाही'…अशी प्रतिक्रिया मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केलीय.लोकसभा निवडणुकीनंतरची व्यूहरचना ठरवण्यासाठी मंबईतल्या षण्मुखानंद सभागृहात सध्या मनसेची सभा नुकतीच पार पडली त्या सभेत राज ठाकरे बोलत होते. 'मराठी माणसाचा दुश्मन तो माझा दुश्मन' अशी बाळासाहेबांनी राज यांच्यावर टीका केली होती. त्यावर 'योग्य वेळी योग्य उत्तर देईन' असं राज यांनी म्हटलं होतं. त्याचाच संदर्भ घेऊन 'लोकसभेत मराठी खासदारांनी आवाज उठवला असता तर मनसेनं लोकसभा निवडणूक कधीही लढवली नसती' असंही राज यावेळी म्हणाले.'उद्धव ठाकरेंनी मतदान कुणाला केलं ? जेम्स लेनचा खटला चालवणार्‍या जेठमलानींना?', अशीही विचारणा राज यांनी यावेळी केली. 'जो मतदार पहिल्यांदा मतदान करत होता त्यांनी आम्हाला मतदान केलं', असंही ठाम वक्तव्य राज यांनी यावेळी केलं. बाळासाहेबांच्या मराठी प्रेमावर कुणीही शंका घेणार नाही पण हे बाकीचे मात्र सोयीची भूमिका घेतात, असंही मत राज यांनी यावेळी व्यक्त केलं. षण्मुखानंद सभागृह माटुंगा इथे सुरू असलेल्या मनसे मेळाव्यात राज यांनी उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका केली. तेव्हा 'मारा पण सॉलिड मारा हा डायलॉग ज्या लोकांनी मनसेवर टीका केली त्यांच्यासाठी होता. काही लोकांनी उगाचच तो स्वत:ला चिकटवून घेतला',असाही टोला राज यांनी यावेळी हाणला.'विधान सभेत मला विचारल्याशिवाय महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरवू शकत नाही, मुख्यमंत्री महाराष्ट्राचा आणि मनसेचाच असेल', असाही विश्वास राज ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला. त्याचवेळी 'मी आगामी विधानसभा निवडणुकांचा उमेदवार नाही हे मी जाहीरपणे सांगतोय आणि इतरांनीही हे लक्षात घ्यावं', असं ठामपणे राज यांनी सभेत बोलताना स्पष्ट केलं. आपल्या तडफदार भाषणानंतर राज पूर्ण आत्मविश्वासाने विधानसभेत उतरणार असल्याचं समजतंय. आता राज यांनी शिवसेनेवर झोडलेल्या या टीकास्राचं शिवसेना काय उत्तर देते याची उत्सुकता आहे. तसंच यापुढे राज काय पाऊलं उचलतील, नेमकं कोणत्या भूंमिकेने विधानसभा निवडणुकांना सामोरे जातील याविषयी चर्चा सुरू झाली आहे.

close