महायुतीत महागोंधळ, घटपक्षांची मनधरणी सुरू

September 24, 2014 5:22 PM0 commentsViews: 3648

raju shetty ramdas athavale jankar24 सप्टेंबर : महायुतीत जागावाटपावरुन आता महानाराजीनाट्य रंगले आहे. आज सकाळी घटकपक्षांनी तीव्र नाराजी व्यक्त महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला मात्र आता या घटकपक्षांच्या नेत्यांच्या मनधरणीसाठी युतीच्या नेत्यांनी प्रयत्न सुरू केले आहे. मुंबईत वांद्रे
इथं महायुतीच्या नेत्यांची बैठक होत आहे. जर 18 जागा दिल्या तर महायुतीत राहु अशी भूमिका घटकपक्षांनी घेतली.

गेल्या आठवड्याभरापासून महायुतीत जागावाटपावरुन रस्सीखेच सुरू आहे. अगोदर युतीत जागावाटपावरून खेचाखेची सुरू होती पण युतीच्या नेत्यांनी युती अभेद्य असल्याची गर्जना केली. पण मंगळवारी रात्री महायुतीच्या झालेल्या बैठकीत मिठाचा खडा पडला. युतीने जागावाटपाचा 150-130-7 असा नवा फॉर्म्युला तयार केला. घटकपक्षांच्या वाट्याला फक्त सातच जागा येत असल्यामुळे राजू शेट्टी, रामदास आठवले, महादेव जानकर यांनी बैठक अर्ध्यावर सोडली. आज सकाळी राजू शेट्टी, महादेव जानकर, विनायक मेटे आणि रामदास आठवले यांनी एकत्र बैठक घेतली. या बैठकीत सर्व नेत्यांनी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला पण याबद्दलचा अंतिम निर्णय संध्याकाळी घेऊ असं ठरलं. अखेरीस भाजपच्या नेत्यांनी पुढाकार घेऊन घटकपक्षांनी एक बैठक बोलावली आहे. या बैठकीला राजू शेट्टी , महादेव जानकर आणि मेटे उपस्थित आहे. मात्र आम्ही 18 जागांवर ठाम असल्याचं राजू शेट्टी यांनी स्पष्ट केलं. जर 18 जागा दिल्या नाहीतर स्वतंत्रपणे निवडणूक लढवू असा इशाराही शेट्टी यांनी दिला. दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी एक निवेदन प्रसिद्ध केलं. यात फडणवीस म्हणतात, ‘महायुतीतून बाहेर पडण्याची भावना छोट्या घटक पक्षांनी व्यक्त करणे दुदैर्वी आहे. या घटकपक्षांना अधिक जागा मिळवून देण्याचा प्रयत्न आमच्याकडून सुरू आहे. हा पेचप्रसंग लवकर संपावा यासाठी आम्ही निकराचे प्रयत्न करत आहोत.’

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close