नरेंद्र मोदी आजपासून अमेरिका दौर्‍यावर

September 25, 2014 9:58 AM0 commentsViews: 1199

v42usa_obama

25 सप्टेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी 4 वाजता करणारे अमेरिकेकडे प्रयाण करणार आहेत. या दौर्‍यात होणार्‍या मोदी-ओबामा भेटीकडे आणि मॅडिसन स्क्वेअरमधल्या मोदींच्या जाहीर भाषणाकडे संपूर्ण जगाचं लक्षं लागलं आहे. मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणाचा आणि अमेरिकेच्या दौर्‍याचा घेतलेला हा खास वेध..

शपथविधी समारंभाला सार्क देशांच्या राष्ट्रप्रमुखांना बोलावण्याच्या नरेंद्र मोदींच्या मास्टरस्ट्रोकनं सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं. परराष्ट्र धोरणावर आपला स्वतःचा ठसा उमटवण्यास मोदी उत्सुक असल्याचं तेव्हाच जाणवलं. पहिल्याच परदेश भेटीसाठी मोदींनी भूतानची निवड केली आणि शेजारच्या देशांची संबंध आणखी मजबूत करणार असल्याचं सांगितलं. नंतर त्यांचा नेपाळ आणि जपानचाही दौरा चांगलाच गाजला. आता अमेरिकेचा दौराही लक्षवेधी होण्यासाठी जय्यत तयारी करण्यात येते आहे

अमेरिकेत राहणार्‍या भारतीयांनाही मोदींच्या दौर्‍याबद्दल प्रचंड उत्सुकता आहे.

2005 मधल्या अमेरिका व्हिसा प्रकरणाच्या कटू आठवणी असल्यानं मोदींनी पंतप्रधान झाल्यानंतर अमेरिका भेटीबद्दल फारशी उत्सुकता दाखवली नाही. अमेरिकेनंच बदलती परिस्थिती ओळखून मोदींना अमेरिका भेटीचं निमंत्रण दिलं. मोदींच्या अमेरिका भेटीत द्विपक्षीय व्यापाराला चालना, अणु ऊर्जेसाठी अमेरिकेकडून जास्तीची मदत, संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत कायमचं स्थान आणि दहशतवादविरोधी लढ्यातलं सहकार्य हे मुद्दे विशेष महत्त्वाचे असतील.

गेल्या 2 दशकांपासून अमेरिकेच्या भारताबाबतच्या भूमिकेत बदल झालाय. भारताची मोठी बाजारपेठ, जुना मित्र असलेल्या पाकिस्तानातली वाढती अस्थिरता, दहशतवादविरोधी युद्धात भारताची होणारी मदत आणि बदलती राजकीय स्थिती या गोष्टी त्याला कारणीभूत आहेत. दुसरीकडे, मोदी सध्या देशातले सर्वात मजबूत राजकीय नेते आहेत. त्यामुळे त्यांच्या दौर्‍याकडे सगळ्यांचं लक्ष असणं आणि त्याचा प्रचंड गाजावाजा होणं अगदी स्वाभाविक आहे. मात्र, अमेरिकेसारखा देश पूर्णपणे कुठल्याच देशाचा मित्र असू शकत नाही. त्यामुळेच या दौर्‍यात मोदी भारताचं जास्तीत जास्त हित कसं साधतात यावर त्यांचं परराष्ट्र धोरणातलं यश अवलंबून राहणार आहे.

मोदींचा अमेरिका दौरातले अग्रक्रमाचे मुद्दे

  • द्विपक्षीय व्यापाराला चालना
  • अणु ऊर्जेसाठी अमेरिकेकडून जास्तीची मदत-
  • संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत कायमचं स्थान
  • दहशतवादविरोधी लढ्यातलं सहकार्य

भारत-अमेरिका संबंध

  • भारताची मोठी बाजारपेठ
  • पाकिस्तानातली वाढती अस्थिरता
  • दहशतवादविरोधी युद्धात भारताची मदत
  • बदलती राजकीय स्थिती

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close