कावळे उडाले, मावळे उरले, शिवसेनेनं डागली तोफ

September 26, 2014 9:50 AM0 commentsViews: 7022

BJP And Shivsena

26 सप्टेंबर :  महाराष्ट्रातली 25 वर्षांची जुनी युती टिकावी यासाठी आम्हीही शेवटपर्यंत प्रामाणिकपणे प्रयत्न केले पण दुदैर्वाने युती कायम राहू शकली नाही असं म्हणत महाराष्ट्राच्या आयुष्यातली अमावस्येची रात्र संपून नवरात्रीचे मंगलमय दिवस सुरू झाले आहेत. पितृपक्षाचे कावळे उडाले आणि आता राहिले फक्त शूर मावळेच असा शब्दांत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला आहे.

भाजप आणि शिवसेनेची 25 वर्षांची युती काल (गुरुवारी) संपुष्टात आल्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (शुक्रवारी) शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर जोरदार टीका केली आहे. शिवसेना-भाजप युती राहावी अशी भावना मित्रपक्षांसह महाराष्ट्रातील 11 कोटी जनतेचीही होती. या भावनेचा चोळामोळा करणारे महाराष्ट्राचे शत्रूच आहेत असे खडेबोलही त्यांनी भाजपला सुनावले आहेत.

यात उद्धव ठाकरे म्हणतात, शिवसेना-भाजप आणि घटकपक्षांची महायुती टिकावी यासाठी आम्हीही शेवटपर्यंत प्रामाणिक प्रयत्न केले, मात्र दुदैर्वाने युती कायम राहू शकली नाही. आता पुढे काय घडेल, काय बिघडेल ते सर्वांनाच दिसेल. फक्त या सर्व राजकारणात महाराष्ट्राच्या भवितव्याचे गणित बिघडू नये. महाराष्ट्र कोसळला तर इतिहास माफ करणार नाही. सध्या प्रत्येक पक्षात ‘सेनापती’ तयार झाले आहेत. काल जे या तंबूत आरती करत होते ते क्षणात दुसर्‍या तंबूत जाऊन नमाज पढतात. विचार, निष्ठा या शब्दांना काही मोलच उरलेले नाही असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close