मुख्यमंत्र्यांचा राजीनामा, राज्यात राष्ट्रपती राजवट ?

September 26, 2014 8:53 PM0 commentsViews: 2110

cm prithviraj chavan resign26 सप्टेंबर :सरकार अल्पमतात आल्यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची चर्चा सुरू आहे आता मात्र राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहेत. नैतिकतेची जबाबदारी घेऊन मुख्यमंत्र्यांनी आपला राजीनामा राज्यपाल सी.विद्यासागर राव यांच्याकडे सुपूर्द केला आहे. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची
दाट शक्यता आता निर्माण झाली आहे.

गेल्या 15 वर्षांची आघाडी राष्ट्रवादी काँग्रेसने तोडली. आघाडीशी काडीमोड घेतल्यानंतर राष्ट्रवादीने काँग्रेसचा पाठिंबा काढून घेतला. एवढंच नाहीतर सर्व मंत्र्यांनी आपल्या मंत्रिपदाचे राजीनामे देऊ केले आहेत. त्यामुळे सरकार अल्पमतात आलंय. सरकार अल्पमतात
आल्यानंतर आज सकाळी भाजपचे विरोधीपक्ष नेते एकनाथ खडसे यांनी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी केली होती. राष्ट्रवादीने पाठिंबा काढल्यानंतर अल्पमतात सरकार आल्यामुळे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला.

गेली चार वर्ष राष्ट्रवादीने मुख्यमंत्र्यांची कोंडी करण्याची संधी कधीही सोडली नाही.पण ऐन विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत राष्ट्रवादीने आघाडी तोडून सरकार पाडण्यास भाग पाडलं. मुख्यमंत्र्यांनीही आपली ‘क्लिन इमेज’ सांभाळात मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन निवडणुकीला सामोरं जाण्याचं दाखवून दिलं. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यामुळे राज्यात आता राष्ट्रपती राजवट लागू होण्याची दाट शक्यता आहे.

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करायची की नाही याबाबत राज्यपालांनी केंद्रीय गृहमंत्रालयाशी अनौपचारिक चर्चा केली. यानंतर राज्यपाल राष्ट्रपती राजवट लागू करायची की, नाही याबद्दल आपला अहवाल केंद्राला पाठवतील त्यानंतर राजवट लागू होईल. विशेष म्हणजे 1986 साली शरद पवार यांचे पुलोद सरकार खाली खेचण्यासाठी इंदिरा गांधींनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली होती त्यानंतर आता राज्यात दुसर्‍यांदा राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close