नव्या सरकारचा 100 दिवसांचा प्लॅन : काँग्रेस रुळावर आणणार ढासळलेली अर्थव्यवस्था

May 23, 2009 6:09 PM0 commentsViews: 4

23 मेयुपीएची सत्तेवर येण्याची ही दुसरी टर्म असली, तरी युपीए सरकारला यावेळेस वेगळ्या समस्यांना सामोरं जावं लागणार आहे. मंदीच्या तडाख्याने ढासळलेली अर्थव्यवस्था रुळावर आणण्याचं तातडीचं काम या सरकारला करावं लागणार. तरुण खासदार मोठ्या संख्येनं निवडून देणार्‍या काँग्रेसला, आजच्या तरुणांना भेडसावणारी बेरोजगारीची समस्याही हाताळावी लागणार आहे. त्यासाठी सरकारने 100 दिवसांचा प्लॅन तयार केला आहे. शपथविधीनंतर युपीए सरकार तातडीनं कामाला लागलं आहे. ' अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी याआधी दिलेल्या दोन पॅकेजचा फारसा परिणाम दिसून आलेला नाही. त्यामुळे यापुढची धोरणं आखताना सरकारला पुनर्विचार करावा लागणार आहे. मोठमोठ्या कंपन्या कटऑफ लिस्ट जाहीर करत असताना, नव्यानं रोजगार निर्माण करण्याचं आव्हान सरकारपुढे असणार आहे. या समस्यांचा सामना करतानाच, सरकारला अर्थव्यवस्थेच्या विकासाकडेही लक्ष द्यावं लागणार आहे, ' असं पी. चिदंबरम् म्हणाले. ' सरकारला देशांतर्गत मागणी आणि देशांतर्गत गुंतवणुकीला चालना द्यावी लागणार आहे. निर्यात वाढीला हातभार लावण्याचं कामही सरकारला करावं लागणार आहे. राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील नव्या पार्लमेंटला उद्देशून जे भाषण करतील, त्यात सरकारच्या या प्रयत्नांचं प्रतिबिंब दिसेल. डाव्यांचा ससेमीरा आता सरकारमागे नसल्यामुळे, जुलैमध्ये सादर होणार्‍या बजेटकडूनही नव्या अपेक्षा ठेवता येऊ शकतात, ' असं प्रतिपादन वीरप्पा मोईली यांनी केलं आहे. तर ' राजकारणालाही नवा चेहरा देण्याचा प्रयत्न युपीए सरकारकडून केला जातोय. यापुढच्या काळात, रिटेल, आयटी, बीपीओ क्षेत्रातल्या तरुणांसाठी स्कील्स डेव्हलपमेंट हे मंत्रालय नव्यानं स्थापन केलं जाऊ शकतं. त्यामुळेच, नवी आव्हानं आणि नव्या समस्यांना तोंड देताना सरकारकडून वेगळ्या वाटा शोधल्या जाऊ शकतात, ' असं कमलनाथ म्हणाले आहेत.

close