पाकला मैत्रीचं गांभीर्य नाही, मोदींनी फटकारलं

September 27, 2014 11:19 PM0 commentsViews: 1315

narendra modi UN General Assembly session27 सप्टेंबर : दहशतवाद आणि चर्चा हातात हात घालून होऊ शकत नाही. आम्हाला मैत्री पाहिजे मात्र पाकिस्तानला गांभीर्याने घेत नाही. काश्मीर प्रश्न सोडवण्याचं संयुक्त राष्ट्र हे व्यासपीठ नाही अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत पाकिस्तानाचा उल्लेख न करता सुनावलं.

संयुक्त राष्ट्रासारखी संस्था असताना अनेक जी समूहाची गरज काय, असं रोखठोक मतही मोदींनी मांडलं. पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत पहिलंच भाषण केलं. त्यांचं भाषण पूर्ण हिंदीतून होतं. या भाषणात त्यांनी दहशतवाद संपवण्यासाठी सर्व देशांनी पुढं यावं असं आवाहनही केलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिका दौरा आणि संयुक्त राष्ट्राची आमसभा ही मोदींसाठी पंतप्रधान म्हणून पहिलीच होती. त्यामुळे अवघ्या जगाचं लक्ष मोदी यांच्याकडे लागलं होतं. मोदी काय बोलणार ? कोणते मुद्दे मांडणार ? भारताची भूमिका काय असणार ? याची उत्सुकता सर्वांना होती. मोदी यांनी अपेक्षेप्रमाणे आपला हिंदी बाणा न मोडता खणखणीत हिंदीतून भाषण करून भारताची संस्कृती आणि अस्तित्वाची झलक दाखवली. मोदींचं हे भाषण 38 मिनिटांचं होतं. आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच वसुधैव कुटूंबकम ही आमची संस्कृती आहे. भारताने शेजारी देशांशी मैत्रीला प्रथम प्राधान्य दिलं. आज भारत जागतिक विकासात भागीदार आहे. आम्ही खूप काही मिळवलं पण अजून खूप काही मिळवायचं आहे. निसर्गानुकूल विकास हे भारताचं धोरण असं सांगत मोदींनी भारताची बाजू मांडली.

शुक्रवारी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरिफ यांनी भाषण केलं होतं यावेळी त्यांनी पुन्हा भारतावरच खापर फोडलं होतं. त्यांच्या भाषणाचा समाचार घेत मोदींनी पाकिस्तानाला खडेबोल सुनावले. आम्हाला पाकिस्तानची मैत्री पाहिजे पण पाकने गांभीर्यानं चर्चेसाठी पुढं यायला हवंय. पाकिस्तानकडे द्विपक्षीय चर्चेसाठी गांभीर्य पाहिजे पण मुळात असे होत नाही. याचा आम्हाला खेद आहे. दहशतवाद आणि चर्चा हातात हात घालून होऊ शकत नाही अशा शब्दात मोदींनी पाकला ठणकावून सांगितलं. आज जगात लोकशाहीचे वारे वाहत आहे. त्यामुळे ‘कुछ भी होनेवाला नही’ ही विचारसरणी बदलली पाहिजे. निराशेचं वातावरण दूर केलं पाहिजे, काळानुसार बदल होणे गरजेचा आहे पण कुठलाही एक देश जगाचं भवितव्य ठरवू शकत नाही असंही मोदी म्हणाले. तसंच जगभरात शांततेचा अभाव असल्यामुळे जगात तणाव वाढत आहेत.आज अनेक देश दहशतवादाला प्रोत्साहन देत आहेत. त्यामुळे दहशतवाद सुरू असताना चर्चा होऊ शकत नाही. यासाठी सर्वच देशांनी दहशतवाविरूद्ध सर्वांनी एकत्र आलं पाहिजे दहशतवादाला वेळीच आवर घालणे गरजेचं आहे. आपण सर्वांनी मतभेद विसरून दहशतवादाशी लढलं पाहिजे असं आवाहनही मोदींनी जागतिक नेत्यांना केलं.

मोदींच्या भाषणातील मुख्य मुद्दे

काश्मीरचा प्रश्न UN मध्ये उपस्थित करून प्रश्न सुटणार नाही
दहशतवाद चांगला किंवा वाईट नसतो
दहशतवादाला काही देश खतपाणी घालतात
निसर्गाशिवाय विकास नको
विकास आणि निसर्ग सोबत पाहिजे
संयुक्त राष्ट्रात सुधारणा व्हावी

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close