आघाडी तोडण्याची तयारी आधीच केली होती-पवार

September 29, 2014 9:07 PM0 commentsViews: 4596

29 सप्टेंबर : काँग्रेससोबत आघाडी तोडण्याची राष्ट्रवादीने आधीच तयारी केली होती असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आयबीएन-लोकमतशी बोलताना केलीय. निवडणुकीनंतर काँग्रेसशी पुन्हा आघाडी होऊ शकते, असे संकेतही पवार यांनी दिले. आयबीएन-लोकमतच्या भविष्य महाराष्ट्राचं या विशेष कार्यक्रमात त्यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या. यावेळी त्यांनी काँग्रेस आणि भाजपवर टीका केली.

गेल्या 15 वर्षांपासून काँग्रेस सोबतची आघाडी राष्ट्रवादी काँग्रेसने जागावाटपाच्या तिढ्यावरून तोडली. 144 जागा आणि मुख्यमंत्रिपदाच्या मागणीवरून आघाडीचा संसार मोडला. काँग्रेसपासून मुक्त झाल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सर्वप्रथम आयबीएन
लोकमतला मुलाखत दिली. आम्ही जाणीवपूर्वक आघाडी तोडण्याचा निर्णय घेतला होता. आपण एकटं लोकांसमोर जायचं आणि महाराष्ट्राच्या चेहरा बदलण्यासाठी थोडाबहुत जो अनुभव मला लोकांनी दिला आहे त्या अनुभवाच्या बळावर नव्या दमाच्या नेत्यांना सोबत घेऊन राज्य आणि राज्याचा चेहरा आम्हाला बदलायचाय. सुदैवाने काँग्रेसच्या नेतृत्वाकरून अशी पावलं टाकली गेली की, त्यामुळे आम्हाला हा निर्णय घेण्यासाठी आणखी सुकर झालं असा गौप्यस्फोट शरद पवार यांनी केला.

सध्या परिस्थिती पाहता सगळेच जण स्वबळावर लढत आहे उद्या जर परिस्थिती बदलली तर तुम्ही भाजपसोबत जाणार का ? असा प्रश्न विचारला असता. पवार म्हणाले, असा कोणताही निर्णय आम्ही घेणार नाही. शक्यतो एकाच पक्षाला संपूर्ण बहुमत मिळाले अशी शक्यता आहे. मुळात प्रत्येक पक्षांचा एक अजेंडा असतो. एक लोकशाहीवर असलेला विश्वास, दुसरा धर्मनिरपेक्ष, सामाजिक परिस्थिती आणि राष्ट्रीय विषय हे मुळात पक्षांच्या अजेंड्यावर असतात. त्यामुळे यासाठी कुणाशीही तडजोड होऊ शकत नाही असं सांगत पवारांनी भाजपसोबत आघाडी करणार नाही असं स्पष्ट केलं. तसंच सध्या देशभरात काँग्रेसची पीछेहाट होऊनही काँग्रेस गतवैभवात रमली आहे जरी उद्या काँग्रेससोबत आघाडी करण्याची तशी वेळ आली तर तसा विचार करू शकतो पण तसं काही होणार नाही. यावेळी आम्हालाच पूर्ण बहुमत मिळेल असा विश्वासही शरद पवार यांनी व्यक्त केला. तसंच निवडणुकीनंतर धर्मनिरपेक्ष पक्षांशी आघाडी करण्याचा पर्याय खुला असणार आहे असंही पवार म्हणाले.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close