‘केम छो’ म्हणत ओबामांनी केलं मोदींचं स्वागत!

September 30, 2014 9:27 AM0 commentsViews: 2141

modi obama dinner

30 सप्टेंबर :अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी गुजरातीतून ‘केम छो’ असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्हाईट हाऊसमध्ये आयोजित करण्यात आलेल्या डिनरमध्ये स्वागत केलं. दोन्ही नेत्यांमध्ये आज द्विपक्षीय चर्चा होणार आहे. या समारंभाच्या माध्यमातून दोन्ही नेत्यांना पहिल्यांदाच अनौपचारिकपणे एकमेकांशी बोलण्याची संधी मिळाली.

यावेळी मोदींनी ओबामा यांना भगवद्गीतेची गांधींजींच्या विवेचनासह खादीच्या कापडात बांधलेली विशेष प्रत भेट म्हणून दिली. त्याचबरोबर मार्टिन ल्युथर किंगचा भारतात झालेल्या भाषणाची ऑडिओ सीडी आणि एक दुर्मिळ फोटो मोदींनी ओबामांना भेट दिला.

राष्ट्राध्यक्षांच्या या समारंभास त्यांच्या पत्नी मिशेल ओबामा या मात्र उपस्थित नव्हत्या. या समारंभास सुमारे 20 अन्य उच्चस्तरीय अधिकारी व मंत्री उपस्थित होते. या मेजवानीला ओबामा यांच्यासह अमेरिकेचे उपाध्यक्ष जो बिडेन, सेक्रेटरी ऑफ स्टेट जॉन केरी उपस्थित होते. मोदी यांच्यासह भारतातर्फे परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवल आणि भारताचे अमेरिकेमधील राजदूत एस.जयशंकर उपस्थित होते .

नवरात्रीचा उपवास करत असलेले मोदी यांनी मेजवानीत काहीही खाल्लं नाही, फक्त कोमट पाणी घेतलं अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आली. ओबामा आणि मोदी यांच्यात जवळपास दीड तास चर्चा झाली.

व्हाईट हाऊसच्या बाहेर अमेरिकेतल्या गुजराती समुदायानं सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अध्यक्ष बराक ओबामांनी खासगी डिनर दिल्यानंतर भारत आणि अमेरिकेनं व्हिजन स्टेटमेंट प्रसिद्ध केलं. भारत अमेरिकेचं चले साथ साथ, असं या निवेदनाचं शीर्षक आहे.

 व्हिजन स्टेटमेंट : ‘चले साथ साथ’

 • शांतता आणि समृद्धीसाठी संयुक्त प्रयत्न
 • सुरक्षेसाठी सतत चर्चा, संयुक्त उपक्रम आणि तंत्रज्ञानाची भागीदारी
 • एकत्रितपणे दहशतवादाचा सामना, मायभूमी आणि नागरिकांचं संरक्षण
 • संहारक अस्त्रांच्या प्रसाराला अटकाव आणि अण्वस्त्र कपात
 • भारत आणि अमेरिका 21व्या शतकातले विश्वासू भागीदार
 • लोकशाही आणि स्वातंत्र्याद्वारे नागरिकांना समान संधी
 • खुल्या आणि सर्वसमावेश जागतिक व्यवस्थेसाठी प्रयत्न
 • संयुक्त राष्ट्रांच्या सुधारित सुरक्षा परिषदेत भारताकडे अधिक जबाबदारी
 • परवडणार्‍या, स्वच्छ, विश्वासार्ह आणि वेगवेगळ्या ऊर्जा स्रोतासाठी प्रयत्न
 • भारताला अमेरिकेकडून अणुऊर्जा तंत्रज्ञान
 • दोन्ही देशांचे नागरिक, अर्थव्यवस्था आणि उद्योगांदरम्यान दृढ संबंध
 • प्रत्येक क्षेत्रामध्ये उच्च तंत्रज्ञानाचा वापर करून संयुक्त संशोधन

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close