नांदोस हत्याकांडप्रकरणी चौघांना फाशीची शिक्षा

May 26, 2009 11:32 AM0 commentsViews: 9

26 मेसंपूर्ण राज्यात गाजलेल्या सिंधुदुर्गमधल्या नांदोस हत्याकांड प्रकरणी अखेर चौघांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अंधश्रद्धेतून झालेल्या या हत्याकांडात तब्बल 10जणांचा बळी गेला होता. 20 डिसेंबर 2003 ला सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या दुर्गम नांदोसच्या डोंगरात पोलिसांना तब्बल 10 मृतदेह सापडले. तपासाचे धागेदोरे नवी मुंबईपर्यंत पोहोचले. अंधश्रद्धेमुळेच नवी मुंबईतल्या माळी कुटुंबातले चौघे आणि इतर 6जणांचा बळी गेल्याचं समोर आलं.मूळचा सिंधुदुर्गमधला असलेला आणि मंुबईत रिक्षा चालवणारा संतोष चव्हाण या हत्याकांडाचा सूत्रधार असल्याचं निष्पन्न झालं आहे. संतोषनेच पैशांचा पाऊस पाडणार्‍या बाबाची भेट घडवून देतो, असं माळी कुटुंबाला सांगितलं. आणि नांदोसच्या डोंगरावर नेऊन त्यांची हत्या करून त्यांच्याकडचे पैसे लुटले. अखेर आज जिल्हा सेशन कोर्टाने त्याला फाशीची शिक्षा सुनावली. त्याचे साथीदार योगेश चव्हाण, महेश शिंदे आणि अमित शिंदे यांनाही फाशीची शिक्षा झाली आहे. पण सूर्यकांत कोरगांवकर आणि तानाजी गावडे या दोघांची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या आरोपींना फाशी व्हावी अशी मागणी आरोपींच्या वकीलांनीच केलीय. ते या शिक्षेविरुद्ध हायकोर्टात दाद मागणार आहेत. त्यासाठीच त्यांचा हा प्रयत्न सुरू आहे. पोलिसांनी या प्रकरणी एकूण 3 खटल्यांमध्ये 10 गुन्हे नोंदवले तर 128जणांच्या साक्षी नोंदवल्या. आणि 6जणांवर आरोपपत्र ठेवलं. या निकालामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात समाधान व्यक्त होतंय. त्यासोबतच अंधश्रद्धा आणि पैशाच्या हव्यासापायी बळी गेलेल्यांबद्दल हळहळही व्यक्त होत आहे.

close