दोन कोटी द्या, तिकीट घ्या !

September 30, 2014 6:01 PM0 commentsViews: 8125

barshi newsसुनील उंबरे, माढा

30 सप्टेंबर : निवडणुकीत पैशांची देवाण-घेवाण होते असं आपण नेहमीच ऐकतो. पण त्याचा पुरावा कधीच हाती लागत नाही. पण सोलापूर जिल्ह्यातल्या माढा मतदारसंघातलं तिकीट विकण्याचा प्रयत्न काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संतोष पाटील यांनी केला. पक्षासाठी दोन कोटी रुपये द्या, अशी मागणी त्यांनी केली.

निवडणूक म्हटली की, पैशांची देवाण-घेवाण होतेच पण ही कशी होते. पाटर्‌यांची तिकिटं कशी विकली जातात. ते आता आपण पाहणार आहोत. दादासाहेब साठे सोलापूर जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते. दोन पिढ्या आमदारकी घरात असल्याने यावेळीचे तिकीट आपल्यालाच मिळेल या अपेक्षेने दादासाहेब प्रचाराला लागले, पण अचानक जिल्हाध्यक्ष संतोष पाटलांचा फोन आला आणि 2 कोटी रुपयांची तयारी आहे का, असा धक्कादायक प्रश्न केला.

संतोष पाटील इथेच थांबले नाहीत तर काही दिवसांपूर्वीच शिवसेनेमध्ये जाऊन पुन्हा काँग्रेसमध्ये आलेले कल्याण काळे 5 कोटींपर्यंत द्यायला तयार आहेत, असा दावा दादासाहेब साठे यांनी केला.

तर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संतोष पाटील म्हणतात, माढ्यातून अखेर उमेदवारी कल्याण काळेंनाच मिळाली. पण आपण कुणालाही तिकिटासाठी एक पैसाही दिला नसल्याचं त्यांनी म्हटलंय. पण रंगेहाथ पकडलं जाऊनही संतोष पाटलांनी स्वतःचा केविलवाणा बचाव केलाय.

उमेदवारीसाठी पैसे मागणार्‍या संतोष पाटलांवर काँग्रेस कारवाई करणार का ? कल्याण काळेंना उमेदवारी मिळण्यामागे पाटलांचा हात आहे का ? काँग्रेसमधील आणि सर्वच पक्षांमधील उमेदवार निवडीची प्रक्रिया पारदर्शक का नाही ? असे अनेक प्रश्न निर्माण होतात.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close