गडकरींचा तोल ढळला, ‘चव्हाण सरपंच बनण्याच्या लायकीचे नाही’

October 1, 2014 5:46 PM0 commentsViews: 2514

gadkari on cm01 ऑक्टोबर : विधानसभेच्या रणधुमाळीत एकमेकांवर टीका करताना नेते खालची पातळी गाठत आहेत. भाजपच्या नेत्यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर निशाणा साधत अत्यंत खालच्या शब्दांत टीका केली आहे. पृथ्वीराज चव्हाण हे अत्यंत अकार्यक्षम आहे की ते ग्रामपंचायतीत सरपंच बनण्याच्या लायकीचे नाही अशी जहरी टीका भाजपचे नेते नितीन गडकरी यांनी केली. तर केंद्रीय नगरविकासमंत्री व्यंकय्या नायडू यांनी तर पृथ्वीराज चव्हाण यांची तुलना चक्क घरातल्या स्वयंपाकिणीशी केलीये.

नागपूर मेट्रो आणि मुंबई मेट्रो तीनच्या भूमीपुजनाच्या कार्यक्रमावरून केंद्रीय नगरविकासमंत्री व्यंकय्या नायडू आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आमनेसामने आले होते. आता विधानसभेच्या रणधुमाळीला सुरूवात झालीये. नांदेडमध्ये झालेल्या एका सभेत व्यंकय्या नायडू यांनी पृथ्वीराज चव्हाण यांची खिल्ली उडवली. व्यंकय्या नायडू म्हणतात, ‘माझ्या पत्नीने मला एकेदिवशी फोन केला आणि म्हणे, आम्ही एक स्वयंपाकी शोधत आहोत आणि एक जण भेटला आहे. तो अत्यंत नम्र आहेत, शिकलेला आहेत आणि कपडेही चांगले घालतो पण एकच अडचण आहे. त्याला स्वयंपाक कसा तयार करायचा हेच माहिती नाही. आता पृथ्वीराज चव्हाण हे सुद्धा चांगले व्यक्ती आहेत, संसदेत आमच्यासोबतही होते. पण सरकार कसं चालवायचं हे त्यांना माहिती नाही आणि त्यांचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनाही माहिती नव्हते.’

तर भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी मुख्यमंत्र्यांवर जहरी टीका केली. गडकरी म्हणतात, ‘आचारसंहिता लागायच्या 15 दिवसांआधी यांचा लकवाच निघून गेला होता. हे रात्रंदिवस सह्या करत होते. शरद पवारसाहेब, एक समिती नियुक्त करा आणि पंधरा दिवसांत लकवाछाप मुख्यमंत्र्यांचा लकवा कसा गायब झाला याचा रिपोर्ट महाराष्ट्राच्या जनतेला सांगा. पृथ्वीराज चव्हाण हे इतके अकार्यक्षम आहे की, ते ग्रामपंचायतीत सरपंच बनण्याचे लायकीचे नाही.’

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close