सरिता देवीने कांस्यपदक नाकारले

October 1, 2014 10:08 PM0 commentsViews: 5860

sarita devi01 ऑक्टोबर : आंतरराष्ट्रीय स्तरावर होणार्‍या आशियाई क्रीडा स्पर्धेत प्रत्येक खेळाडू मेहनतीची पराकाष्टा आणि शर्थीचे प्रयत्न करत आहे. पण मला हे कांस्यपदक नको असं ठणकावून सांगण्याचं धाडस केलंय भारताची बॉक्सर सरिता देवीने. पंचाच्या चुकीच्या निर्णयामुळे सरिता देवीला रौप्यपदकाला मुकावं लागलं. आपल्यावर अन्याय झालाच पण भारतीय ध्वजाला तिसर्‍या स्थानावर पाहावे लागले म्हणून कांस्यपदक घेण्यास नकार दिला होता असा खुलासाही सरिताने सीएनएन-आयबीएनकडे केला.

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडू रोज भरीव कामगिरी करून सोनेरी दिवस दाखवत आहे. पण आजचा दिवस भारतासाठी एकीकडे अभिमानाचा होता आणि दुर्देवाचाही. पाच वेळा वर्ल्ड चॅम्पियन राहिलेल्या मेरी कोमने ‘गोल्डन’ पंच लगावत अपेक्षेप्रमाणे सुवर्णपदकाला गवसणी घातली. दोन मुलाची आई असलेल्या मेरी कोमच्या यशाचं देशभरात कौतुक होतं आहे. पण दुसरीकडे भारताची बॉक्सर सरिता देवीच्या बाबतीत वेगळंच घडलं.

सेमी फायनलमध्ये दक्षिण कोरियाच्या बॉक्सरविरुद्धच्या मॅचमध्ये अव्वल कामगिरी करुनही सरिता देवीला पराभूत घोषित केलं गेलं. पंचांच्या निर्णयामुळे सरिताला एकच धक्का बसला. पारितोषिक वितरण समारंभात सरिताने कास्यपदक घ्यायला नकार दिला. यावेळी सरिताला अश्रू अनावर झाले.मात्र थोड्यावेळाने कांस्यपदक हातात घेतले. खरं तर या सगळ्या प्रकरणी भारतीय टीमनं अपील केलं होतं. पण पंचांनी हे अपील फेटाळून लावलं.

सीएनएन-आयबीएनने तिची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा सरिताने आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. मी कांस्यपदक घेण्यास नकार दिला यात मला काहीच चुकीचं वाटत नाही. मी जे काही केलं ते देशासाठी केलं. जेव्हा मला कास्यपदक दिले जात होते तेव्हा भारतीय ध्वज तिसर्‍या स्थानावर दिसले. हे पाहून मी स्वत:वर नियंत्रण ठेवू शकले नाही. मला रडू कोसळलं आणि कांस्यपदक घेण्यास नकार दिला असा खुलासा सरिताने केला. तसंच सरिताने ऑफिशियल्स, बॉक्सिंग फेडरेशन आणि आईओएच्या अधिकार्‍यांवर मदत न करण्याचा आरोप केलाय. आपला विरोध दर्शवण्यासाठी मला 500 डॉलरची गरज होती पण माझ्याकडे फक्त 400 डॉलर होते मी तिथे मीडियाच्या प्रतिनिधींकडून 100 डॉलर घेतले आणि तक्रार केली पण एवढं करून सुद्धा साधं सांत्वन सुद्धा कुणी केलं नाही असं अश्रू पुसत सरिताने सांगितलं.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close