काँग्रेसचा जाहीरनामा : विद्यार्थांना टॅब देणार, मुंबईचे टोल बंद करणार !

October 2, 2014 6:52 PM0 commentsViews: 1356

congress menifesto02 ऑक्टोबर : विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला त्यांच्यापाठोपाठ आता काँग्रेसनेही आपला जाहीरनामा प्रसिद्ध केलाय. दोन्ही काँग्रेसनं सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून जाहीरनाम्यांमध्ये आश्वासनं दिली आहेत.

राष्ट्रवादीने कोरडवाहू शेतकर्‍यांना दरमहा पेन्शन देणे, बस स्थानकांवर 20 रुपयांमध्ये स्वस्त जेवण देणे, बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना लॅपटॉप अशी आश्वासनं दिली आहेत. तर काँग्रेसने 10 वी पासून विद्यार्थ्यांना टॅब, मुलींना पदवीपर्यंत मोफत शिक्षण, गरीब मुस्लीम विद्यार्थ्यांसाठी आश्रमशाळा, शेतकर्‍यांसाठी कृषी दर्शन वाहिनी, विशेष महिला पोलीस स्टेशन्स, मुंबईतील पाचही टोल नाके बंद करणे इत्यादी आश्वासनं दिली आहेत.

विदर्भाचा मागासलेपणा दूर करण्यासाठी औद्योगिक धोरणात तरतुदी या जाहीरनाम्यात आहेत. प्रत्येकाला संधी मिळवून देण्याचा प्रयत्न आम्ही जाहीरनाम्यातून केलाय असं काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण म्हटलंय. तर शेतकरी, गरीब, दलित,मागासवर्गीय,मुस्लीम,युवक,महिला आणि विद्यार्थी या वर्गाला केंद्रस्थानी ठेवून जाहीरनामा तयार केलाय असं काँग्रेसच्या जाहीरनामा समितीचे अध्यक्ष सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितलं. तसंच भालचंद्र मुणगेकर यांच्या टीमनं हा जाहीरनामा तयार केलाय. महाराष्ट्राच्या पाच वर्षांच्या विकासाचा आराखडा यात मांडण्यात आलाय असंही सुशीलकुमार शिंदे म्हणाले. एकूणच, काय दोन्ही काँग्रेसने सर्वच क्षेत्रातल्या मतदारांना खूश करण्याचा प्रयत्न जाहीरनाम्यांमधून केलाय, असं दिसतंय.

काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील आश्वासनं

 • राज्यातील सर्व गावे पक्क्या रस्त्यांनी जोडणार
 • शिक्षण हक्क कायद्याची 100 टक्के अंमलबजावणी करणार
 • 10 वी च्या विद्यार्थ्यांना टॅब देणार
 • मुलींना पदवीपर्यंतचे शिक्षण मोफत
 • महाविद्यालयीन शिक्षण घेणार्‍या मुलींना सेल्फ डिफेन्सचे विषय सक्तीचं करणार
 • प्रत्येक जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करणार
 • मुंबईला जोडणारे सर्व टोलनाके बंद करणार
 • टोलमधील कमीत कमी अंतर 60 किमी करणार
 • दुष्काळग्रस्त जिल्ह्यात दुष्काळ निवारण निधी उभारणार
 • त्यासाठी दरवर्षी 500 कोटींची तरतूद करणार
 • पोलीस दलात मुस्लिमांना योग्य ते प्रतिनिधीत्व देण्यात येईल
 • मौलाना आझाद महामंडळाच्या अनुदानात चौपट वाढ
 • गरीब मुस्लीम विद्यार्थ्यांसाठी निवासी शाळा
 • शेतकर्‍यांसाठी कृषीदर्शन वाहिनी सुरू करणार

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close