पैशांना फुटले पाय, दोन दिवसांत 1 कोटी जप्त

October 2, 2014 11:51 PM0 commentsViews: 847

money found02 सप्टेंबर : ‘पैसा बोलता है’ असं म्हटलं जातं त्यामुळेच निवडणुकीत नेहमी पैशाचं गणित जुळवण्याचा प्रयत्न केला जातो. प्रत्येक निवडणुकीच्या काळात प्रचंड प्रमाणात काळा पैसा बाहेर निघतो. निवडणुकीचं वातावरण तापतंय पण दुसरीकडे पैशाला पाय फुटले आहे. राज्यात चार वेगवेगळ्या कारवाईमध्ये दोन दिवसांत तब्बल 1 कोटी 12 लाख रुपये जप्त करण्यात आले आहे. मुंबईत भांडुप, धुळे, पंढरपूर आणि परभणीत लाखो रुपये जप्त करण्यात आले आहे. पण पैशांच्या मालकाचा पत्ताच नाही त्यामुळे ही रोकड कुणाची याचा काहीच थांगपत्ता नाहीय.

धुळे जिल्ह्यातल्या साक्री इथं आज (गुरुवारी) भरारी पथकाने 36 लाख 50 हजारांची रोख रक्कम जप्त केली. साक्री- नंदूरबार हायवेवर सिंगबन इथं एका बोलेरो गाडीतून ही रक्कम जप्त करण्यात आली. भरारी पथकाने ही रक्कम आयकर विभागाच्या स्वाधीन केलीय. या प्रकरणी गाडी आणि तीन जणांना ताब्यात घेण्यात आलंय. या रोख रकमेचा मालक कोण याचा शोध पोलीस घेत आहेत. गुजरात पासिंगची ही बोलेरो गाडी आहे. गाडीचा नंबर जीजे-16 एटी 623 आहे. तर बुधवारी पंढपूरमध्ये गोपाळपूर इथं एका मारूती व्हॅन मधून भरार पथकाने 40 लाखांची रक्कम जप्त केली याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली असून पोलिसांनी मारूती व्हॅनही जप्त केलीय. तर आज संध्याकाळी मुंबईमध्ये भांडुप भागात एलबीएस रोडवर एका रिक्षा तपासणीदरम्यान 25 लाखांची रक्कम सापडली भरारी पथकानं ही कारवाई केलीय. तर परभणीमध्ये निवडणुकीच्या तोंडावर मतदारांना पैसे वाटपाचा प्रयत्न झाल्याचा संशय आहे. परभणी जिल्ह्यात पालम तालुक्यातील तांदुळवाडीमध्ये 27 हजार रोख रक्कम आणि मतदार याद्या जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र पैसे वाटप करणारे फरार झाले आहे.

आयबीएन-लोकमतचे प्रश्न

- या पैशांचा मालक कोण ?
– कशासाठी आले होते पैसे ?
– निवडणुकीत वाटपासाठी आले होते का पैसे ?
– पैशांच्या मूळ मालकाला का पकडलं जात नाही ?

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close