तटकरेंच्या कामावर नाराज, कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीला रामराम

October 3, 2014 5:09 PM0 commentsViews: 2815

tatkare raigad03 सप्टेंबर : विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादीला मोठा धक्का बसलाय. तटकरेंच्या कार्यप्रणालीवर नाराज होऊन महेंद्र दळवी, राजीव साबळे आणि प्रकाश देसाई, संदीप जाधव पक्षातून बाहेर पडले आहेत. जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शेकापसोबत युती करण्याचा तटकरेंचा निर्णय त्यांच्यासाठी अडचणीचा ठरतोय. ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षाला गळती लागल्यानं राष्ट्रवादीची मोठी कोंडी झालीय.

रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या जडणघडणीत सुनील तटकरे यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे पक्षांनी जिल्ह्यात जोरदार बाळस धरले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थामधील निवडणुकीत पक्षाला मोठ यशही मिळाले आहे. मात्र ऐन विधानसभा निवडणुकीपुर्वी जिल्ह्यात राष्ट्रवादीची कोंडी होत असल्याचे पहायला मिळते आहे. आघाडी तुटली असतांनाच पक्षातील अनेक दिग्गज नेते आता पक्षत्याग करत आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या सुनील तटकरे यांनी रायगडात राष्ट्रवादी काँग्रेस वाढवली. त्याच सुनील तटकरेंवर आज रायगड जिल्ह्यातील अनेक राष्ट्रवादीचे नेते नाराज आहेत.

जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शेकाप सोबत युती करण्याचा तटकरे यांचा निर्णय त्यांच्यासाठी अडचणीचा ठरतो आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ऐनवेळेवर डावलण्यात आल्याने पक्षप्रतोद महेंद्र दळवी यांनी राष्ट्रवादीचा त्याग केला आहे. जिल्हा परिषदेतील विरोधी पक्षनेते राजीव साबळे हे देखील नाराज असून शिवसेनेच्या वाटेवर आहेत. सुधागड पाली तालुक्यातील राष्ट्रवादीचे संघटक आणि तटकरे यांचे निकटवर्तीय प्रकाश देसाई यांनी देखील पक्षत्याग केला आहे. तर महाड शहर अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष संदीप जाधव यांनी पक्ष सोडला आहे.

ऐन विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीतच पक्षाला गळती लागल्याने राष्ट्रवादीची मोठी कोंडी झाली आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे पक्षत्याग करणार्‍या नेत्यांनी तटकरे यांच्या कार्यप्रणालीवरच प्रश्नचिन्ह उभे केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने राज्यातील संघटना मजबूत करण्याची जबाबदारी दिलेल्या तटकरे यांना रायगडातील पडझड रोखण्याचे आव्हान असणार आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close