26/11 संदर्भात राम प्रधान समितीने दिली मुंबई पोलिसांना क्लिन चिट

May 27, 2009 11:58 AM0 commentsViews: 5

27 मे मुंबईवर 26 नोव्हेंबर रोजी झालेल्या हल्ल्याच्या वेळी पोलीस यंत्रणेच्या कामाची चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या राम प्रधान समितीनं मुंबई पोलिसांना क्लीन चीट दिली आहे. प्रधान समितीने मुंबई हल्ल्याबाबतचा रिपोर्ट मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना आज सादर केला. पोलीस यंत्रणेत असलेल्या त्रुटी आणि त्या सुधारण्यासाठी सुचवण्यात आलेले बदल यासाठी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्य सचिव राम प्रधान आणि माजी पोलिस अधिकारी जी. बालचंद्रन यांची एक समिती स्थापन केली होती. त्यांनी आपला रिपोर्ट मुख्यमंत्र्यांसमोर सादर केला. 26/11 हल्ल्यादरम्यान मुंबईची सुरक्षाव्यवस्था ढिसाळ होती हे समितीने अहवालात मान्य केलं आहे. पण हल्ल्यांबाबत महाराष्ट्र पोलिसांना केंद्रीय गुप्तचर विभागाकडून थेट माहिती मिळाली नाही असंही समितीनं म्हटलं आहे. याबद्दलच्या अनेक गोष्टी न्यायप्रविष्ट असल्याने त्याबद्दल जास्त चौकशी करता आली नाही. 26/11 हल्ल्यांदरम्यान पोलीस कंट्रोल रुममधील 5 हजार लॉग्ज प्रधान समितीने तपासले आहेत. कोणतीही पोलीस यंत्रणा युद्धसदृश्य परिस्थिती हाताळू शकली नसती. पण मुंबई पोलिसांनी वेगाने कारवाई केली. समितीने सुचवलेल्या अनेक गोष्टींवर पोलीस विभागाने आधीच अंमलबजावणी सुरू केली आहे. ' राम प्रधान यांच्या समितीने सादर केलेला अहवाल सर्वात आधी मंत्रीमंडळासमोर मांडणार. त्यांनतरच तो अधिवेशनात सभागृहासमोर सादर होईल. त्यानंतर राम प्रधान समितीच्या शिफारशींवर कारवाई केली जाईल, ' असं मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणाले.

close