मोदींनी ओढला काँग्रेस-राष्ट्रवादीवर आसूड, सेनेवर मौन

October 4, 2014 5:30 PM0 commentsViews: 2493

modi on ncp congress04 ऑक्टोबर : पंतप्रधान आणि भाजपचे नेते नरेंद्र मोदींची बीडमध्ये विराट सभा पार पडली. या सभेत त्यांनी आघाडी सरकारवर घणाघाती टीका केली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांचं गोत्र, यांची उद्दिष्ट, यांच्या सवयी सर्व एक आहे. हे पक्ष राष्ट्रवादी नाही, तर भ्रष्टाचारवादी आहेत अशी टीका मोदींनी केली. एकीकडे काँग्रेस-राष्ट्रवादी मोदींनी आसूड ओढला मात्र शिवसेनेवर बोलण्याचं टाळलं. या सभेत मोदींनी गोपीनाथ मुंडेंच्या आठवणीना उजाळा दिला.

गेल्या 25 वर्षांची युती जागावाटपाच्या मुद्यावरुन तुटली. युती तुटल्यानंतर शिवसेनेनं युती तुटण्यास भाजपला जबाबदार धरलं. आपल्या प्रचारसभातून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपवर कडाडून टीका केली. याचपार्श्वभूमीवर आज (शनिवारी) बीडमध्ये प्रितम मुंडे-खाडे यांच्या प्रचारासाठी भव्य सभा पार पडली. विधानसभा निवडणुकीत मोदींची ही पहिलीच प्रचारसभा होती. त्यामुळे मोदी काय बोलता याकडे सगळ्याचं लक्ष लागलं होतं. दुपारी मोदी बीडमध्ये दाखल झाले. मोदींनी आपल्या शर्टाला पक्षाचे चिन्ह कमळ लावून सभास्थळी पोहचले. आपण पंतप्रधान म्हणून नाहीतर भाजप नेते म्हणून आलो असंच त्यांनी दाखवून दिलं.

‘मुंडे माझे लहान भाऊ’

मोदींनी भाषणाची सुरूवात मराठीतून करून बीडकरांची मनं जिंकली. हा विराट जनसागर गोपीनाथ मुंडेंच्या तपस्येचं फळ आहे. आज जर गोपीनाथ मुंडे असते तर मला इथं येण्याची गरज नसती. 30 वर्षं त्यांच्यासोबत काम केलं. मुंडेंसारथा लोकनेता आता होणे नाही. गावाचा, गरिबांचा, शेतकर्‍यांचा कोणी विकास करेल तर गोपीनाथ मुंडे करतील असा मला विश्वास होता. आज महाराष्ट्रातला बच्चा-बच्चा गोपीनाथ आहे. मुंडे माझे लहान भाऊ होते असं सांगत त्यांनी मुंडेंच्या आठवणींना उजाळा दिला.

‘काँग्रेस-राष्ट्रवादी भ्रष्टाचारावादी पक्ष’

गेली 15 वर्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सत्ता उपभोगली. 15 वर्षांचा कालखंड खूप मोठा असतो. या 15 वर्षाच्या काळात काँग्रेस-राष्ट्रवादीनं एक पिढी उद्‌ध्वस्त केलीये. याच्यात मुख्यमंत्री बनण्याची अनेकांची स्वप्नं पूर्ण झाली पण सर्वसामान्यांचं एकही स्वप्न पूर्ण झालं नाही.
महाराष्ट्र सरकारमध्ये बसलेले लोक दररोज ‘कौन बनेगा अरबपती’ खेळत होते. त्याचाच परिणाम म्हणजे महाराष्ट्र उद्‌ध्वस्त झाला इथं घड्याळ आणि हाताची अभद्र युती होती. मुळात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं गोत्र एकच आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे पक्ष भ्रष्टाचारवादी आहे अशी टीकाही मोदींनी केली.

‘महाराष्ट्र हा आमचा मोठा भाऊ’

महाराष्ट्राची भूमी शिवछत्रपतींची भूमी आहे. महाराष्ट्र हा आमच्या गुजरातपेक्षा ही मोठा आहे. गुजरातच्या तुलनेत महाराष्ट्र हा आमचा मोठा भाऊ आहे. पण आता नेमकं असं काय झालंय की, तो वेगळ्या कारणांसाठी चर्चेत आहे ? महाराष्ट्राची सत्ता अशा लोकांच्या हाती दिली ज्यांना स्वत:चीच काळजी जास्त होती. त्यामुळे देशाचा विकास करायचा असेल तर महाराष्ट्राला वाचवायला हवं. महाराष्ट्रात इतकं सामर्थ्य आहे की, तो देशाला आर्थिक गती देऊ शकतो आता वेळ सत्ता परिवर्तनाची आली आहे. मला महाराष्ट्राला गुजरातच्या पुढे घेऊन जायाचंय असं आश्वासनही मोदींनी दिलं.

मोदींनी दिली आश्वासनं

मला महाराष्ट्राचा विकास करायचाय, पण हा विकास जास्तीत जास्त व्हावा, म्हणून इथे भाजपचंच सरकार नको का ? असा सवाल मोदींनी केला. चीन महाराष्ट्रात अत्याधुनिक इंडस्ट्रियल पार्क बनवणार आहे, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन होणार आहे. या सर्व मुद्द्यांनी मोदींनी मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. भाजपचं सरकार आणा, 60 महिन्यांमध्ये आम्ही राज्यासमोरच्या सर्व अडचणी दूर करू,असं आश्वासन मोदींनी दिलं.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close