कुणाशीही युती-आघाडी करणार नाही -राज ठाकरे

October 6, 2014 8:11 PM0 commentsViews: 3922

raj thackarey iv06 ऑक्टोबर : मला कुणाबरोबर युती-आघाडी करायची नाहीये. महायुती आणि आघाडीचं काय झालं हे सगळ्यांनी पाहिलंय त्यामुळे हा निर्णय घेणार नाही अशी स्पष्ट भूमिका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मांडली. तसंच उद्या जर मोदींच्या मंत्रिमंडळात शरद पवार दिसले तर आश्चर्य वाटणार नाही असं सूचक वक्तव्यही राज ठाकरे यांनी केलंय. आयबीएन लोकमतच्या ‘भविष्य महाराष्ट्राचं’ या कार्यक्रमात आयबीएन लोकमतचे कार्यकारी संपादक मंदार फणसे आणि महेश म्हात्रे यांच्याशी राज यांनी दिलखुलास बातचीत केली.

विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष स्वबळावर मैदानात उतरले आहे. भाजप आणि शिवसेनेचा 25 वर्षांचा संसार मोडलाय तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीची 15 वर्षांची आघाडीही संपुष्टात आलीये. सर्वच पक्ष स्वबळावर लढत असल्यामुळे बहुमत कुणाला मिळणार असा प्रश्न निर्माण झालाय. निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना आणि मनसे अर्थात दोन्हीही ठाकरे बंधू एकत्र येतील असा तर्क लढवला जात आहे. मात्र मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘एकला चलो’चाच नारा दिलाय. राज ठाकरे यांनी सर्वप्रथम आयबीएन लोकमतला दिलेल्या मुलाखतीत स्पष्टीकरण दिलंय. यांची युती कशी तुटलीये हे सगळ्यांनी पाहिलंय. मुळात यांना कुणाशीही काहीही देणंघेणं नाही. त्यामुळे मला निवडणुकीनंतर कुणाशीही युती-आघाडी करायची नाही असं स्पष्ट मत राज यांनी व्यक्त केलं. युती तोडण्यामागे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचा हात होता. भाजपला शरद पवारांना सोबत घ्यायचं म्हणून युती तोडली असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला होता. त्यांचा विधानाचा धागा पकडून राज यांनी शरद पवारांवर निशाणा साधला. उद्या जर शरद पवार नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात दिसले तर आश्चर्य वाटणार नाही, असा टोला राज यांनी लगावला.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close