अजित पवारांच्या बॅगेत सापडली 4 लाखांची रोकड

October 8, 2014 8:21 PM0 commentsViews:

ajit pawar bag08 ऑक्टोबर :विधानसभा निवडणुकीत राज्यात पैशांचा पाऊस पडतोय. धक्कादायक बाब म्हणजे राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बॅगेत जवळपास चार लाख रुपये सापडले आहेत. परभणीतल्या गंगाखेड-परळी नाक्यावर पोलिसांनी एका स्कॉर्पियो गाडीतून चार लाख 85 हजार रुपये असलेल्या तीन बॅगा जप्त केल्या आहेत. अद्याप या प्रकरणात गुन्हा मात्र दाखल करण्यात आला नसून चौकशी सुरू आहे.

आज दुपारी परभणीमध्ये गंगाखेड-परळी नाक्यावर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विजय भांबळे यांच्या गाडीत सापडलेल्या 3 बॅगा या माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, त्यांचे स्वीय सहायक यांच्या असून त्यात 4 लाख 85 हजार,पवारांचे कपडे व व्हिजिटिंग कार्ड सापडल्याचे पोलिसांनी सांगितले. जिंतूरहून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष तथा उमेदवार विजय भांबळे यांची स्क्रॉपिओ क्रमांक एम एच 09-5210 ही गाडी गंगाखेड मार्गे लातूरला जात असताना परळी चेक पोस्टवर या गाडीची तपासणी करण्यात आली. यात 3 बॅगा असल्याने पोलिसांनी ही गाडी ठाण्यात घेवून जात तपासणी करण्यात आली. त्यावेळी या 3 बॅगा उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांचे स्वीय सहाय्यक देशमुख व सुरक्षारक्षक यांच्या असल्याचे निष्पन्न झाले असून यात अजित पवारांच्या बॅगेत 4 लाख,स्वीय सहायक देशमुख यांच्या बॅगेतून 85 हजार व प्रत्येकाचे व्हिजिटिंग कार्ड,कपडे सापडल्याचे पोलिसांनी सांगितले असून या प्रकरणात कुठलाही गुन्हा मात्र अद्याप दाखल करण्यात आला नाही केवळ चौकशी सुरू असल्याचे पोलीस उपअधीक्षक शंकर केंगार यांनी सांगितले आहे. मात्र, अजित पवार हे राष्ट्रवादीचे स्टार कॅम्पेनर आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे एवढी रक्कम असू शकते. हे पैसे पक्षानंच प्रचारासाठी दिले आहेत, असा खुलासा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आयबीएन लोकमतकडे केला.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close