होमग्राऊंडवर सुनील तटकरेंची प्रतिष्ठापणाला !

October 10, 2014 3:03 PM0 commentsViews:

मोहन जाधव, श्रीवर्धन
 
10 ऑक्टोबर : विधान परिषदेवर निवडून गेल्याने राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे विधानसभेची निवडणूक लढवणार नसले श्रीवर्धन मतदारसंघ राष्ट्रवादीकडे कायम राखण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे. कोकणातील सर्वाधिक विकासनिधी मिळालेल्या या मतदारसंघात आजही आपले वर्चस्व कायम आहे हे देखील त्यांना दाखवून द्यावे लागणार आहे.

रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन विधानसभा निवडणुकीची लढत यावेळी लक्षवेधी ठरणार आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या या मतदारसंघात यावेळी बहूरंगी लढत पाहायला मिळणार आहे. विधानपरीषदेवर निवडून गेल्याने तटकरे स्वतः ही निवडणूक लढवणार नसल्याने मतदारसंघातील गणित बदलणार आहे, राष्ट्रवादीकडून सुनील तटकरे यांचे पुतणे आणि रोह्याचे नगराध्यक्ष अवधुत तटकरे निवडणूक लढवत आहेत. शिवसेनेकडून उपजिल्हाप्रमुख रवी मुंडे निवडणुक रिंगणात आहेत. भाजपने शिवसेनेचे बंडखोर कृष्णा कोबनाक यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसकडून उदय कठे तर शेकापकडून अस्लम राऊत निवडणूक रिंगणात आहेत. मात्र प्रमुख लढत ही शिवसेनेचे रवी मुंडे आणि राष्ट्रवादीचे अवधुत तटकरे यांच्यात होणार आहे.

एकेकाळी बॅरीस्टर अंतुले यांचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघावर भगव्या लाटेत शिवसेनेने वर्चस्व मिळवले होते. गेल्या निवडणूकीत शिवसेनेची मक्तेदारी मोडीत काढत राष्ट्रवादीच्या सुनील तटकरे यांनी या विजय मिळवला. गेल्या पाच वर्षात आपल्या मंत्रीपदाचा वापर करून तटकरे यांनी साडेपाचशे कोटी रुपयांचा निधी या मतदारसंघात आणला. कोकणाच्या इतर मतदारसंघाच्या तुलनेत हा कितीतरी अधिक होता. या विकासकामांच्या जोरावर राष्ट्रवादी या निवडणुकीला सामोरी जात आहे. मात्र विरोधकांनी मात्र राष्ट्रवादीचा हा दावा खोडून काढला आहे. रस्ते, पाणी, वीज यासारख्या पायाभुत सुविधांची मतदारसंघात वानवा असल्याच विरोधकांचे म्हणणं आहे

लोकसभा निवडणुकीत सुनील तटकरे यांना या मतदारसंघातून चांगले मताधिक्य मिळाले असले तरी, स्वत: तटकरे ही निवडणूक लढणार नसल्याने गणित बदलणार आहेत. त्यातच तटकरे यांचे पुत्र अनिकेत आणि मुलगी आदिती यांची प्रचारातील गैरहजेरी राष्ट्रवादीसाठी डोकेदुखी ठरते आहे. या मतदारसंघावर कुणबी समाजाचे वर्चस्व आहे. त्यामुळे शिवसेनेसाठी कृष्णा कोबनाक यांची उमेदवारी अडचणीची ठरणार आहे.

एकूणच या निवडणुकीच्या निमित्ताने सुनील तटकरे यांची प्रतिष्ठापणाला लागली आहे. त्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष या मतदारसंघावर आहे. शिवसेनेचे कडवे आव्हान अवधुत तटकरे पेलु शकणार का हे पहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close