मलालाचा थरारक लढा

December 10, 2014 1:57 PM0 commentsViews:

malala_yousafzai

मलाला युसुफझईबद्दल जगाला माहीत होण्याआधीही मलालाला हे पक्क माहीत होतं की, तिला शाळेत जायचं आहे. पाकिस्तानच्या स्वात खोर्‍यातल्या तालिबान्यांसाठी मात्र मलाला, मुलींना शाळेत घालावं म्हणून लढा देतेय म्हणजे शरियत कायद्याला ती थेट धोका पोहोचवतेय.

रक्तात माखलेल्या मलालाला हॉस्पिटलमध्ये नेलं जात होतं तेव्हा सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकला होता. तेहरिक-ए-तालिबान या पाकिस्तानच्या बंदूकधार्‍यांनी मलालाच्या शाळेच्या व्हॅनवर हल्ला केला आणि तिच्यावर गोळी झाडली. मलाला हॉस्पिटलमध्ये जगण्याशी लढा देत होती तेव्हा तिच्या समर्थनासाठी मेणबत्ती मोर्चे निघाले पण मलालाच्या मेंदूला झालेली गंभीर दुखापत आणि तालिबान्यांचा धोका या दोन्ही गोष्टींचं आव्हान होतं. मलालाला तिच्या कुटुंबाबरोबर उपचारासाठी लंडनला नेण्यात आलं.

तालिबान्यांनी कितीही प्रयत्न केला तरी ते मलालाचा आवाज दाबू शकले नाहीत. जसजशी तिची तब्येत सुधारू
लागली तसतशी तिची हिंमत पुन्हा बुलंद होत गेली. या मुलीनं नंतर संयुक्त राष्ट्रांत भाषण दिलं. ती जगातल्या नेत्यांना भेटली, तिला अनेक ऍवॉर्ड्स मिळाले. ती जिथे जाईल तिथे गर्दी तिची वाट बघायची. तिच्या या लोकप्रियतेमुळे तालिबानी जेरीस आले. त्यांनी तिला धमकावणं सुरूच ठेवलं पण या प्रतिकूल परिस्थितीतही मलालाचा आवाज जगभरात पोहोचला.

एका लेखकानं लिहिलंय, शांततेचं नोबेल या सगळ्यात कमी वयाच्या मुलीला मिळालं. खरं तर मलालाला आता या पुरस्काराची आवश्यकता नाही, तर या पुरस्काराला मलालाची आवश्यकता आहे.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close