कसाबचे लाड बंद करून त्याला फाशी द्या – उद्धव ठाकरेंची पत्रकाद्वारे मागणी

May 30, 2009 1:50 PM0 commentsViews: 1

30 मे कसाबचे लाड बंद करून त्याला तत्काळ फाशीवर देण्याची मागणी शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी पत्रकाद्वारे केली आहे. त्या पत्रकातून त्यांनी सरकारवरही तोफ डागली आहे. त्याचबरोबर अफझललाही लवकरात लवकर फाशी द्यावी अशी मागणीही त्यांनी या पत्रकात केली आहे. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याची थातूरमातूर चौकशी करून धूळफेक करण्यापेक्षा अफजल आणि कसाबला तत्काळ फासावर लटकवून या विषयावर कायमचा पडदा टाका, अशीही मागणी त्यांनी पत्रकातून केली आहे. तसंच उद्धव ठाकरे यांनी मुंबई हल्ल्याच्या चौकशीचा राम प्रधान अहवाल म्हणजे निव्वळ धुळफेक असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. पुढे उद्धव ठाकरे पत्रकातून असंही म्हणतात की, ' 26/11 च्या हल्ल्याची जबाबदारी कुणावरही न टाकता राम प्रधान समितीने सगळ्यांनाच मोकळं रान दिलं आहे. हा अहवाल आणि कसाबचा खटला म्हणजे राज्य सरकारचा तमाशा असून जनतेच्या पैशाची उधळपट्टी चाललीय. नराधम कसाबचे इतके लाड कशासाठी चाललेत. त्याला बचावाची संधी देऊन या हल्ल्यातील बळींची आणि हुतात्म्यांची सरकारने चेष्टाच चालवली आहे. ज्याला फासावर लटकवायचंय त्याच्या सुरक्षेसाठी रोज लाखो रूपये खर्च होतायत. ज्या पोलिसांचे बळी गेले त्यांना अत्याधुनिक शस्त्र पुरवण्यात सरकारी नियम आड येतात, मग कसाबवर चाललेला हा खर्च कोणत्या नियमात बसतो. आणि मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्याचा ठपका ठेऊन ज्या विलासरावांना मुख्यमंत्रीपदावरून जावं लागलं त्यांनाच केंद्रीय मंत्रीपदाची बक्षिसी देऊन काँग्रेसने शहिदांच्या जखमेवर मीठ चोळलं आहे.

close