‘हुदहुद’चा तडाखा, विशाखापट्टणममध्ये दोघांचा मृत्यू

October 12, 2014 11:34 AM0 commentsViews:

BzuYl6cIQAAk20V

12 ऑक्टोबर : हुदहुद चक्रीवादळ आज (सकाळी) 11.30च्या सुमारास आंध्र प्रदेशाच्या विशाखापट्टणमच्या किनारपट्टीवर धडकलं आहे. या चक्रीवादळाच्या तडाख्यात आत्तापर्यंत 2 जणांचा मृत्यू झाला आहे.

विशाखापट्टणमच्या किनारपट्टीच्या भागात सध्या 170-180 किलोमीटर प्रति तास वेगानं वारे वाहात आहेत. या वादळाचा अंदमान, ओडिशा व आंध्र या तीन राज्यांवर याचा अधिक परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जातं आहे. हवामान खात्याच्या इशार्‍यानं राज्य आणि केंद्र सरकार सतर्क झाले आहेत. त्यामुळं गेल्या चार-पाच दिवसांपासून किनारपट्टीवरच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम सुरू आहे.

पहिला टप्पा म्हणून आंध्र किनारपट्टीवरील पाच जिल्ह्यांतील सुमारे 1.11 लाख नागरिकांना तर ओडिशाच्या गंजम जिल्ह्यातील 3.5 लाख नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. आणखी सुमारे 5 लाखांहून अधिक नागरिकांना हलविण्याची तयारी करण्यात आली आहे. येत्या 24 तासांत आंध्रच्या विशाखापट्टणम तर ओडिशाच्या गोपालपूर किनारपट्टीवर काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. प्रशासनाकडून जिवीत आणि वित्त हानी टाळण्यासाठी विशेष काळजी घेण्यात आली आहे. ‘विशाखापट्टणम जिल्ह्यात एनडीआरएफच्या 13 टीम्स दाखल झाल्या आहेत. आत्तापर्यंत या वादळातून 67 हजार लोकांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे. हवामान विभागानुसार हुदहुद चक्रीवादळ धडकल्यानं आता यापुढे जास्त नुकसान होणार नाही आशी माहिती ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी दिली आहे.

दरम्यान, चक्रीवादळामुळे निर्माण होणार्‍या परिस्थितीला तोंड देण्यासाठी ओडिशा सरकारने पुर्ण तयारी केली आहे, असा दावा ओडिशा सरकारने केला आहे. या वादळाचा रेल्वे आणि विमान वाहतुकीवर परिणाम झाला आहे. साऊथ सेंट्रल मार्गाच्या 62 ट्रेन्स रद्द करण्यात आल्या आहेत. तर 51 ट्रेन्सचे मार्ग बदलण्यात आले आहेत.

 

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close