‘हुदहुद’च्या तडाख्यात 26 ठार; जनजीवन विस्कळीत

October 14, 2014 9:02 AM0 commentsViews:

power1_2150178g

14 ऑक्टोबर : आंध्रप्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टीला ‘हुदहुद’ चक्रीवादळाने तडाखा दिल्यानंतर, आता मदतकार्यावर लक्ष केंद्रीत करण्यात येत आहे. वार्‍याचा वेग कमी झाला असला, तरी किनारपट्टीसह अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (मंगळवारी) दुपारी 12 वाजता विशाखापट्टणमला जाऊन मदतकार्याची पाहाणी करणार आहेत. मदतकार्य अधिकार्‍यांशीही ते चर्चा करणार आहे.

हुदहुद वादळाचा जोर आता ओसरला जरी असला तरी आंध्र आणि ओडिशामध्ये जनजीवन विस्कळीत झालं आहे. ‘हुदहुद’ चक्रीवादळामुळे आतापर्यंत 26 जणांचा मृत्यू झाला आहे तर ओडिशात 3 जणांचे मृत्यू झाले आहेत.

सुमारे 200 किलोमीटर प्रतितास वेगाने वाहणार्‍या ‘हुदहुद’ चक्रीवादळाने आंध्र प्रदेशाच्या उत्तर आणि ओडिशातल्या दक्षिण किनारपट्टीला रविवारी तडाखा दिला. वादळाचा जोर ओसरला असला तरी विशाखापट्टणम, श्रीकाकुलम आणि विजयनगरम या जिल्ह्यांमध्ये, तसेच ओडिशामधील काही भागात जोरदार ते मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या वादळामुळे किमान 10 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तसेच छत्तीसगड, पश्चिम बंगाल, तेलंगणा, मध्य प्रदेशचा दक्षिण भाग, उत्तर प्रदेशचा पूर्व भाग, बिहार, झारखंड आणि महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. विशाखापट्टणममध्ये जीवनावश्यक वस्तूंची टंचाई निर्माण झाल्याने किराणा मालसह पाण्याचे आणि दुधाचेही भाव गगनाला भिडले आहेत. एक लीटर पाण्याच्या बाटलीसाठी 250 रुपये तर एक लीटर दूधासाठी 100 रुपये मोजावे लागत आहेत.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close